वर्धा : सरकारकडून नाफेडच्या माध्यमातून हमी दराने सोयाबीनची खरेदी करण्यात येत आहे. हमीदरात सोयाबीन खरेदीची मुदत संपल्याने शेतकर्यांपुढे प्रश्न निर्माण झाला आहे. अद्यापही अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन घरीच आहे. शासनाने सोयाबीन खरेदीची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.
शासनाने सोयाबीनला ४८९२ रुपये हमीभाव जाहीर केले आहे. यावर्षी बाजारात सोयाबीनचे भाव घसरले आहेत. शेतकरी हमीदरात सोयाबीनची विक्री करण्यास प्राधान्य देत आहेत. जिल्ह्यात नाफेडच्या माध्यमातून ९ हजार १२ शेतकर्यांनी नोंदणी केली होती. त्यातील ८९४६ शेतकर्यांना एसएमएस पाठविण्यात आले होते. पाच फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील आठ केंद्रांवर एक लाख ५४ हजार ४२ किलो सोयाबीनची हमी दराने खरेदी करण्यात आली. बहुतांश केंद्रांवर नोंदणी झालेल्या शेतकर्यांचे सोयाबीन खरेदी करण्यात आले होते. पण काही केंद्रांवर मात्र शेतकर्यांचे सोयाबीन प्रलंबित होते. अनेक शेतकरी विविध अडचणींमुळे अखेरच्या दिवशी सोयाबीन विक्रीसाठी आणू शकले नाहीत. यामुळे अनेक शेतकर्यांना सोयाबीन हमीदरात विकता आलेले नाही. यामध्ये शेतकर्यांना मोठे नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून देण्याची मागणी होत आहे.
- अजूनही अनेक शेतकर्यांकडे सोयाबीन आहे. बाजारात सोयाबीनचे दर कमी आहेत. विविध कारणांमुळे सोयाबीन घरी आहे. अशा स्थितीत खरेदी बंद केल्यास शेतकर्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. सरकारने सोयाबीन खरेदीची मुदत वाढवून द्यावी, अशी प्रतिक्रिया वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमीत गावंडे यांनी व्यक्त केली.