लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा फटका बसला होता, अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन करत महाविकास आघाडीला धक्का दिला. सर्वाधिक जागा जिंकत भाजप महायुतीमध्ये मोठा पक्ष ठरला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासूनच महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी इच्छूक होते, मात्र भाजपनं गृहमंत्रिपद आपल्याकडे ठेवल्यानं ते नाराज झाले अशी देखील चर्चा सुरू होती. त्यानंतर पालकमंत्रिपदावरून देखील एकनाथ शिंदे नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहेत का? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. अखेर त्याचं उत्तर आता एकनाथ शिंदे यांनीच दिलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. मी कोणावरही नाराज नाहीये, तुम्हाला कोणी सांगितलं की मी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे असा सवालही यावेळी त्यांनी केला. त्यामुळे आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, तुम्हाला कोणी सांगितलं की मी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे. काल झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीला देखील आम्ही दोघे उपस्थित होतो. आम्ही दोघांनी चर्चा केली. जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा ते माझ्या मंत्रिमंडळात होते. आता ते मुख्यमंत्री आहेत तर मी त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. आम्ही प्रत्येकवेळी दोघांनी एकमेकांचं समर्थन केलं आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी मी सदैव त्यांच्यासोबत उभा आहे.
सध्या लाडकी बहीण योजेनेवरून पुन्हा एकदा विरोधक सरकारच्या कोंडीचा प्रयत्न करत आहेत. याला देखील एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सरकारच्या कोणत्याही योजना बंद होणार नाहीत, मी मुख्यमंत्री असताना आम्ही ज्या काही योजना सुरू केल्या होत्या त्या सुरूच राहणार आहेत. लाडकी बहीण योजना बंद होणार नसून, लाभार्थी महिलांना पैसे मिळत राहातील असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.