पहिलं आंडं की कोंबडी? हा वाद आता जुना झाला आहे. आता नवा वाद निर्माण झाला आहे तो म्हणजे कोंबडी प्राणी आहे की पक्षी? साधारणपणे असे वाद हे सोशल मीडियावरवच होतात. मात्र प्रकरण एवढं गंभीर वळणावर पोहोचलं की थेट हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणात गुजरात हायकोर्टात याचिका दाखल करत कोंबडीचा समावेश हा प्राण्यांच्या श्रेणीमध्ये करावा की नाही? असा सवाल उपस्थित करण्यात आला, याचिकाकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी गुजरात न्यायालयात सुनावणी पार पडली.
गुजरात हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता की, कोंबडी असो अथवा कोंबडा त्यांना फक्त कत्तलखान्यातच मारले पाहिजे की, पोल्ट्री फार्ममध्ये? सामान्यपणे कोंबड्याला पंख असतात त्यामुळे ते पक्ष्यांच्या श्रेणीमध्ये येतात पण गुजरात हायकोर्टानं नेमका या प्रकरणात काय निर्णय घेतला ते जाणून घेऊयात.
या प्रकरणात अॅनिमल वेलफेअर फाउंडेशन आणि अहिंसा महासंघच्या वतीनं 2023 मध्ये हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेमध्ये चिकनच्या दुकानात कोंबडी कापण्यावर बंदी आणावी अशी मागणी करण्यात आली होती. या याचिकेत अशी मागणी करण्यात आली होती की कोंबडी असो अथवा कोंबडा ते फक्त कत्तलखान्यातच कापले जावेत. कोंबडी चिकनच्या दुकानात कापली जात असल्यामुळे नियमांचं उल्लंघन होत असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून करण्यात आला होता.
सुनावनीदरम्यान या प्रकरणात न्यायालयानं सरकारकडून माहिती मागवली. कोंबडा हा प्राणी आहे की पक्षी असा सवाल न्यायालयानं सरकारकडे उपस्थित केला. न्यायालयाला उत्तर देताना सरकारने सांगितलं की, फूड अँण्ड सेफ्टी स्टॅडर्डनुसार कोंबडी हा पक्षी नसून प्राणी आहे. कोंबडीला प्राणीच मानलं गेलं आहे.
विज्ञानाचा विचार केला तर कोंबडी हा प्राणी देखील आहे आणि पक्षी देखील. कोंबडीचं वर्गीकरण हे अॅनिमल किंगडम एनिमेलिया या प्रवर्गात करण्यात आलं आहे. या प्रवर्गात झाडं, फंगस आणि जीवाणू सोडून सर्व सजीवांचा समावेश होतो.