नवी दिल्ली : ‘राजधानीतील मराठी साहित्य संमेलन दिल्लीत मराठी माणसाचे महत्व वाढवणारे ठरेल', अशा भावना ‘मराठी भाषा, मराठी माणूस आणि दिल्ली’ या परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केल्या. दिल्ली महाराष्ट्रापासून दूर असली तरीही दिल्लीचे तख्त राखण्यासाठी कायम मराठी माणूस धावला आहे, अशाही भावना मान्यवरांनी बोलून दाखवल्या. सरहद, पुणे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या परिसंवादाचे दिल्लीत आयोजन करण्यात आले.
साहित्य संमेलनाची आयोजक आणि सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार हे अत्यंत उत्कृष्ट आयोजन करत आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेक चांगले कार्यक्रम राबवले आहेत. ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक होईल, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
प्रशासकीय अधिकारी आनंद पाटील म्हणाले की, तमिळनाडूपासून दिल्लीपर्यंत महाराष्ट्राबाहेर राहून महाराष्ट्र अनेक वर्षांपासून बघितला. आपला देदीप्यमान इतिहास आपल्या नव्या पिढ्यांनाही माहिती व्हावा आणि महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी बांधवांकडूनही महाराष्ट्राची सेवा घडावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. महाराष्ट्राबाहेर अनेक अधिकाऱ्यांना स्थिरस्थावर होताना ज्येष्ठ अधिकाऱ्यांची मदत झाली. त्यांनी स्थापन केलेले मराठी माणसाचे समूह, संस्थांची मदत झाली, अशा भावना सौरभ देशमुख यांनी व्यक्त केल्या.
डॉ. मेधा कुलकर्णी आणि अमोल कोल्हे यांनी खासदार होण्यापूर्वी महाराष्ट्रातून दिल्लीला राजधानी म्हणून ते कसे बघत होते, त्यावेळी त्यांच्या काय भावना होत्या. पुढे संसदेत खासदार म्हणून आल्यानंतर दिल्लीतून महाराष्ट्र आणि देशाकडे कसे बघतात यावर भाष्य केले. महाराष्ट्रात जन्माला आलेले महापुरुष, इतिहासात त्यांनी गाजवलेलं कर्तृत्व हे कायम प्रेरणादायी असल्याचे सांगत छत्रपती शिवाजी महाराज, त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य, पानिपतची लढाई अशा ऐतिहासिक घडोमोडींचे संदर्भ दिले.
राजधानी दिल्लीत मराठी सण, उत्सव, आपल्या लोकांना साजरे करता आले पाहिजेत. आपण जिथे राहतो तिथे मराठी वातावरण नाही, अशा भावना दिल्लीत आलेल्या मराठीजणांच्या मनात येऊ नयेत, यासाठी दिल्लीत राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती आणि त्याचे महत्त्व वैभव डांगे यांनी सांगितले.
परिसंवादात खासदार सुप्रिया सुळे, खासदार अरविंद सावंत, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील अतिरिक्त सचिव आनंद पाटील, भारतीय डाक विभागातील संचालक सौरभ देशमुख, दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे वैभव डांगे, दिल्लीस्थित जेष्ठ पत्रकार सुनील चावके यांनी आपले विचार व्यक्त केले. दिल्लीस्थित पत्रकार प्रशांत वाघाये आणि नुपूर साळुंखे यांनी हा संवाद घडवून आणला.
आपल्या पुढच्या पिढ्यांना मराठी भाषा नीट बोलता आली पाहिजे, ती शिकवली गेली पाहिजे. मराठी भाषिक लोकांचं सण-उत्सवानिमित्त एकत्रीकरण झाले पाहिजे, या सगळ्या गोष्टींसाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत. राजधानी दिल्लीतील 'महाराष्ट्र सदन' हे दिल्लीत राहणाऱ्या मराठी लोकांना आपले माहेरघर वाटलं पाहिजे, यासाठी राज्य सरकारने प्राधान्याने काही गोष्टी कराव्यात, अशा अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.