स्टॅंडअप कॉमेडियन मारहाण प्रकरणी सुशीलकुमार शिंदे यांच्या नातवावर गुन्हा दाखल झाला आहे. file photo
Published on
:
06 Feb 2025, 3:42 pm
Updated on
:
06 Feb 2025, 3:42 pm
सोलापूर ः ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहारिया याचा स्काय फोर्स हा चित्रपट सोलापुरात गर्दी खेचत आहे. अशातच वीर याच्यावर येथील स्टॅन्डअप कॉमेडियन प्रणीत मोरे याने जोक केल्याने त्याला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तन्वीर शेखसह 12 जणांवर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, या घटनेचा अभिनेता वीर पहारिया यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या मारहाणीबद्दल खेद व्यक्त केला आहे. या प्रकरणास आता राजकीय रंग येत चालला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनीच स्टॅन्डअप कॉमेडियन प्रणीत याला मारहाण केल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.
स्टॅन्डअप कॉमेडियन प्रणीत मोरे याला मारहाण करण्याची घटना दोन फेब्रुवारीला सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास 24 के क्राफ्ट ब्रिव्हज, सात रस्ता येतील रेस्टॉरंटमध्ये घडली. याप्रकरणी लक्ष्मण मोहन झेंडे (वय 33, रा. अमोल निवास बंगलो नंबर 94, वैष्णवी नगर भाग 2, विजापूर रोड, जुळे सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून तनवीर शेख याच्यासह बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण पाटील हे करीत आहेत.
भाजप आमदारांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट
याप्रकरणी अक्कलकोट येथील भाजपचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी आज सायंकाळी सोलापूर पोलीस आयुक्तांची भेट घेतली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्टॅन्डअप कॉमेडियन प्रणीत मोरेला मारहाण केली. या सर्वांवर कारवाई करावी अशी मागणी आ. कल्याणशेट्टी यांनी आयुक्तांकडे केली. प्रणितसारख्या हरहुन्नरी कलाकारास अशी मारहाण होणे हे निषेधार्ह व दुर्दैवी असल्याचेही ते म्हणाले.