Published on
:
06 Feb 2025, 3:15 pm
Updated on
:
06 Feb 2025, 3:15 pm
शिरोली एमआयडीसी : शिरोली सांगली फाटा येथील एका सँनिटरी मटेरियल दुकानचे गोडाऊन फोडून आठ लाखाचे बाथरूम व घरासाठी लागणारे प्लबिंग साहित्य चोरी करणाऱ्या राजेंद्रनगर कोल्हापूर येथील दोन महिलाना ताब्यात घेवून त्यांच्याकडून चोरीस गेलेला माल हस्तगत केला.
अधिक माहिती अशी की, शिरोली सांगली फाटा येथील मार्बल लाईनला नागावकर ट्रेडर्सचे गोडाऊन असून या गोडाऊनमध्ये बाथरूम व घरासाठी लागणारे वेगवेगळ्या कंपनीचे साहित्य ठेवण्यात आले होते. या साहित्याची ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी या चार दिवसाच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे कुलूप तोडून गोडाऊनमधील ८ लाख ९ हजार ५५० रूपयाच्या मालाची चोरी केली होती. या बाबतीत तक्रार शिरोली पोलिसात अमोल रामचंद्र वडार याने दिली होती.
या घटनेचा तपास करताना खब-याकडून व सिसीटिव्ही फुटेज तपासले असता राजेंद्रनगर येथील आश्विनी दत्ता नाईक (वय ३४) व अनिता विनायक चांदणे (वय ३७) या दोन महिलांनी या चार दिवसाच्या कालावधीत गोडाऊनचे कुलूप तोडून मालाची चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले . त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरी केल्याचे कबुल केले. त्यांच्याकडून चोरीस गेलेले साहित्य हस्तगत केले आहे.
या गुन्ह्य़ाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण , अमित पांडे , बिरंजे , नजीर शेख , ऋषी पोवार , संकपाळ यांनी केला .