कोकणची ट्रेन गोरखपूरला वळवली, अशीच सूरतची ट्रेन पाटण्याला वळवली का? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला विचारला. तसेच त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ईव्हीएम मशीन वाटते असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आज रेल्वे कामगार सेनेचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कामगारांना संबोधित केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, आताचा जमाना असा आहे, की पक्षात येण्यापूर्वी आरक्षण पाहिजे. आरक्षण असेल तर लोक पक्षात येतात. आणि जरा कुठे खुट झालं तर आरक्षण दिलेलं असलं तरी लोकं डबे बदलतात, गाड्या बदलतात. पण त्यातले तुम्ही नाही. मला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे. रेल्वे कामगार म्हणजे एकच रूळ आहे आणि त्या रुळावरून तुमची योग्य वाटचाल सुरू आहे, त्याबद्दल मला अभिमान आहे. ज्यांना उद्दिष्टाचं रुळ नाही हेतू नाही ते भरकटत आहेत. कधी या फलाटावर कधी त्या फलाटावर, त्यांना समाधान काहीच नाही. पण तुमच्यासारखे कट्टर आणि कडवट कार्यकर्ते आहेत ते कसलीही अपेक्षा न करता, केवळ आणि केवळ भगव्याचे पाईक. काहीही होवो माझा भगवा मी नाही सोडणार. आणि हे सगळे तुम्ही भगव्याचे पाईक तुम्ही सर्व आहात, तोपर्यंत मला चिंता नाही. काही लोक म्हणतात की आम्ही विचार सोडले, आम्ही विचार कधीही सोडलेले नाहीत. हातात जो भगवा घेतला आहे ते सतीचं वाण आहे. एक वसा म्हणून घेतलेला आहे. तो भगवा हातातून सुटणं कदापि शक्य नाही.
तसेच काल अर्थसंकल्प जाहीर झाला. पूर्वी रेल्वेचा अर्थसंकल्प वेगळा होता, रेल्वेचं वेगळं महत्त्व होतं. पण हे सरकार आल्यानंतर एक एक संस्था मारून टाकण्याचं काम सूरू आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. रेल्वेचा अर्थसंकल्प हा मुख्य अर्थसंकल्पात विलीन केला. पण भारतीय रेल्वेत कोकण रेल्वेची मर्जरची मागणी आहे, तिचं मर्जर होत नाहीये. ही त्यांची मर्जी अजिबात चालणार नाही. शिवसेनाप्रमुखांनी धोरण आखून दिले आहे, आपण सेवा देतो. मला नेहमी चिंता आहे ही आहे की आता तुमच्यापैकी मोटरमन किती आहेत ? कामगार किती आहेत. या कार्यक्रमाला आलं तरी रेल्वे कोण चालवणार? आपल्या न्यायहक्कासाठी आंदोलन करावीच लागतात. काय इंगा दाखवाचा तो दाखवूच. आम्ही संयमी आहोत याचा अर्थ आम्ही भेदरट नाही आहोत. आमच्या ताकदीची आम्हाला कल्पना आहे. दिल्लीत बसलेली लोकं दिल्लीपुरतं बघतात. आताही त्यांनी उफराटा निर्णय घेतला. कोकणची रेल्वे त्यांनी गोरखपुरला वळवली. गोरखपुरा दुसरी ट्रेन न्या त्याचा आम्हाला विरोध नाही. पण आमची हक्काची कोकण रेल्वे तिकडे वळवून नेणार असाल तर आम्ही पेटूनच उठणार. अहमदाबादची ट्रेन पाटण्याला नेली असं कधी झालंय का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी विचारला
नितीन गडकरी असे म्हणाले होते की मुंबई गोवा हायवे असा बनवू की त्यावर 200 वर्ष खड्डाच पडणार नाही. आता लोक म्हणतात की 200 वर्ष झाली तर रस्ता होणार नाही. म्हणजे रस्ता व्हायला 200 वर्ष आणि त्यानंतर पुढची 200 वर्ष, बोलायला काय जातंय? मी तुम्हाला असं काहीतरू करू देईन की पुढची हजार वर्ष काही होणार नाही. अरे हजार वर्ष लेका तु तरी जगतोस का? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने टर्मिनस आहे. तिथे अजून पुतळा लावलेला नाही. आता प्रशासनाला तारीख द्या त्यांनी नाही लावला तर आम्ही तो पुतळा लावू. कारण त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ईव्हीएम मशीन वाटते. महाराजांचा जयजयकार केला तर लोक मतं देतात. ही नतद्रष्ट माणसं
आपली दैवतं ही फक्त मतांसाठी आणि राजकारणासाठी वापरतात. आताच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला भरघोस आलेलं आहे असं सांगतात. जे आलंय ते तुमच्यापर्यंत पोहोचतंय की नाही हे प्रश्न महत्त्वाचा आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
निवडणुकीचा निकाल असा लागूच शकत नाही हे आजही अनेकजण सांगत आहेत. आहेत त्या संस्था मारून टाकायच्या. एसटीची आज वाट लागलेली आहे. काल परवा मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प जाहीर झाला. जशी रेल्वे जीवनवाहिनी आहे तशी माझी एसटी गावागावात, खेड्यापाड्यात जाते. तशी बेस्टची बस ही अनेक गल्ली बोळात जाते. पण आज एसटी तोट्यात चालली आहे, बेस्टचा कोणी वाली राहिलेला नाही. रेल्वेचंही कधी खासगीकरण होईल हे सांगता येत नाही. आहेत त्या संस्था मोडायच्या. मुंबई ही जगातली सर्वात श्रीमंत महापालिका होती, ती सुद्धा यांनी विकायला लावली आहे. म्हणजे सगळ्यांनी कष्ट करून तोट्यात असलेली मुंबई महापालिका ती आपण नफ्यात आणली. पालिकेची 92 हजार कोटी रुपयांची मुदत ठेवी होती. त्या आता 80 हजार कोटी रुपयांवर आल्या आहेत. त्यात अडीच लाख कोटी रुपयांची त्यांनी देणी करून ठेवली आहेत. आधीच्या गद्दार आणि आताच्या ईव्हीएम सरकारनेही मुंबई खड्ड्यात घातली. मुंबई पालिकेवर एवढं कर्ज केलंय की पुढचे 23 वर्ष ही देणी द्यावी लागतील असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
आज आपल्या रेल्वे कर्मचारी सेनेत प्रवेश झाले आणि आणखी होतील. विधानसभा निवडणुकीत भाजपने बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा दिली होती. पण इथे युनियनमध्ये कशी फूट पाडायची, तोड फोड कशी करायची, तोडा आणि फोडा ही निती हे आजचे राज्यकर्ते अवलंबत आहेत अशी टीकाही उद्धव ठाकरे म्हणाले.