Published on
:
06 Feb 2025, 4:49 pm
Updated on
:
06 Feb 2025, 4:49 pm
लोहारा : लोहारा खुर्द (ता. लोहारा) येथे एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. ही घटना गुरुवारी (दि.६) दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पिस्टल व एकास लोहारा पोलीसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, नितीन मधुकर अरगडे व राम रसाळ ( दोघे रा. लोहारा खु. ता. लोहारा) हे शेताकडे तलावात पाण्याची मोटार टाकण्यासाठी जात असताना नितीन अरगडे हा नट आवळ्याचा पाणा आणण्यासाठी गेला. एवढ्यात रावण देविदास रसाळ हा तेथे आला व नितिन कुठे गेला? असे विचारले. तेवढ्यात नितीन अरगडे तिथे आला. यावेळी माझ्या व सावत्र बहिणीच्या भांडणात साक्षीदार का झालास, सही का केलीस? अशी विचारणा करीत रावण देविदास रसाळ याने स्वतः कडील पिस्टल काढून नितीन मधुकर अरगडे यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्यात नितीन मधुकर अरगडे हा ठार झाला.
या प्रकरणी लोहारा पोलीसांनी रावण देविदास रसाळ याला ताब्यात घेतले असून रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालूच होती. याप्रकरणाची माहिती मिळताच लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले, पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्रे यांच्यासह पोलीस फाटा घटनास्थळी दाखल झाला. धाराशिवचे पोलीस निरीक्षक संजय जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गौर हसन, उमरगा पोलीस उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार यांनीही घटनास्थळी भेट दिली.