चार दुकाने फोडून २ लाखाची चोरी चोरट्यांनी केली होती.File Photo
Published on
:
06 Feb 2025, 3:51 pm
Updated on
:
06 Feb 2025, 3:51 pm
किनवट : शहराच्या मुख्य मार्गावर नगरपरिषदेच्या अगदी शेजारीच असलेली चार दुकाने चोरट्यांनी मंगळवारी (दि.४) रात्री फोडून तब्बल १ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल लंपास केला होता. स्थानिक पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या चोरीचा छडा लावून चारपैकी दोन आरोपींना अटक केली. किनवट शहराच्या मुख्य मार्गावर असलेली श्री मेन्स वेअर, एक वडापाव आणि एक इडली सेंटर आणि सद्गुरू ट्रेडिंग अशी चार दुकाने चोरट्यांनी फोडली होती. या दुकानातून तब्बल १ लाख ९४ हजाराचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले होते. याआधी याच परिसरात शनिवारी (दि. 01) रात्री रामदेव शर्मां यांचे घर चोरटयांनी फोडले होते. या घरातून पावणे दोन लाख रुपयांची रोख रक्कम व चांदीचे दागिन्यांची चोरी झाली होती. काही दिवसांमधील या चोरीच्या प्रकरणामुळे पोलिसांसमोर चोरट्यांना शोधण्याचे मोठे आव्हान होते.
यादरम्यान तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सागर झाडे यांना दुकाने फोडणाऱ्या चोरट्यांबाबत गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, डीवायएसपी रामकृष्ण मळघणे, पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला व देवीदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दिनेश येवले यांच्यासोबत योजना आखली आणि बुधवारी सायंकाळी शहराच्या गंगानगर भागातील संशयित अशोक कुंटलवार याच्या घरी पथकासह धाड टाकली. या घरात चोरीचे दीड लाख रुपयांचे कपडे व इतर काही माल आढळला. तो जप्त करून संशयित आरोपी अशोक कुंटलवार याला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच एका अल्पवयीन मुलासह दोन सराईत गुन्हेगार विष्णू मेटकर व दीपक साळुंखे यांच्यासह चोरी केल्याची त्याने कबुली दिली. पोलिसांचा सुगावा लागल्याने विष्णू व दीपक हे दोघेही फरार झाले. अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले असून फरार संशयितांचा शोध सुरू आहे.