अमरावती, पुढारी वृत्तसेवा:
अमरावतीत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्यावर गुरूवारी (दि.6) कापूस आणि सोयाबीन फेकला. शेतकर्यांच्या सोयाबीन, कापूस व तुरीला भाव मिळावा या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. यावेळी दादा भुसे यांचा ताफा तेथून जात असतांना शिवसैनिकांनी ताफ्यावर सोयाबीन आणि कपाशी फेकून सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला.
आजपासून सोयाबीनची नाफेड मार्फत होणारी सोयाबीन खरेदी बंद होणार आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन तसेच पडून आहे तर काही शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी भावात आपल्या सोयाबीनची विक्री केली आहे. त्यामुळे सोयाबीन खरेदीची मुदत वाढवावी, अशी मागणी करत शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमण झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी गुरूवारी (दि.6) आंदोलन केले. यादरम्यानच जिल्हा दौऱ्यावर असलेले शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या ताफ्यावर सोयाबीन आणि तूर फेकून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.
दरम्यान ठाकरे गटाच्या काही शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पराग गुडधे हे कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरले. या दरम्यान ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. काही वेळासाठी तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.
सोयाबीन, कापूस, तुरीला बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत असून सोयाबीनला 8 हजार रुपये, कापसाला 10 हजार रुपये तर तुरीला 12 हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. महायुतीच्या भावांतर योजनेवरही यावेळी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. तसेच नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी सुरू करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात असतांना, घोषणाबाजीने परिसर दणाणला. शिवसैनिक जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्याचा आग्रह धरत होते. मात्र, पोलिसांनी गेटवरच त्यांना अडवले. यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काहीवेळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.