लांजा : आक्रमक ग्रामस्थांशी चर्चा करताना लांजा पोलिस. pudhari photo
Published on
:
06 Feb 2025, 1:20 am
Updated on
:
06 Feb 2025, 1:20 am
लांजा : खोडसाळ व बनावट कागदपत्रे तयार करून पत्नी, मुलांच्या आणि नातेवाईकांच्या नावाने सरकारी योजनांच्या कामांची ठेकेदारी परस्पर घेऊन मनमानी पद्धतीने कारभार करणार्या बेनी खुर्द-खेरवसे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्यांविरोधात ग्रामस्थांनी बुधवार, 5 जानेवारी रोजी आक्रमक पवित्रा घेत हल्लाबोल केला. न्याय मिळत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीमधून हटणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. मनमानी करणार्या सदस्यांवर कठोर व दंडात्मक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
बेनी खुर्द-खेरवसे ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये मनमानी करणार्या सदस्यांविरोधात चौकशी करून कायदेशीर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, लांजा तहसीलदार, पंचायत समिती यांच्याकडे केली आहे. दरम्यान, माहितीच्या आधाराखाली खेरवसे-बेनीखुर्द येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या सरकारी योजनांची माहिती मागवली होती. या मिळालेल्या माहितीच्या आधारे सदस्यांचा मनमानी आणि स्वार्थी हेतूचा कारभार उजेडात आला असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. सदस्यांची सखोल चौकशी करून व कारवाई करावी, यासाठी लांजा गटविकास अधिकारी यांना 20 डिसेंबर 2024 रोजी एक निवेदन देण्यात आले होते. याबाबत ग्रामस्थांनी लांजा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधित सदस्यांची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, गटविकास अधिकरी यांनी 9 जानेवारी 2025 रोजी चौकशी करण्यात येईल, अशी ग्रामस्थांना तारीख दिली होती.
9 जानेवारी तारीख टळून गेल्याने ग्रामस्थांनी पुन्हा पंचायत समिती येथे जाऊन गटविकास अधिकारी यांची भेट घेवून विचारणा केली असता, मिटिंग असल्याचे कारण देत 5 फेब्रुवारी 2025 रोजी चौकशी घेण्यात येईल असे ग्रामस्थांना सांगितले होते. त्यानुसार बुधवारी पंचायत समिती प्रशासनाकडून चौकशी प्रतिनिधी म्हणून विस्तार धिकारी संजय लोखंडे हे बेनी खुर्द ग्रामपंचायत येथे हजर झाले होते. चौकशी तहकूब करण्यात येत असल्याचे लोखंडे यांनी ग्रामस्थांना सांगताच चौकशीसाठी आलेल्या अधिकार्याला ग्रामपंचायत कार्यलयात अडवून ग्रामस्थांनी अडवून धरले. मात्र, वरिष्ठ अधिकारी येत नाहीत, तो पर्यंत ग्रामपंचायत येथून जायला देणार नाही, असा पवित्र ग्रामस्थांनी घेतला होता.
यादरम्यान तब्बल दोन तास ग्रामस्थांचा हल्लाबोल सुरू राहिल्याने ग्रामस्थांसमोर नमते घेत पंचायत समितीचे अधिकारी यांनी अखेर बेनी खुर्द-खेरवसे ग्रामपंचायत येथे धाव घेतली होती. दरम्यान, ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बेनी खुर्द-खेरवसे ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय बंडबे (बेनी खुर्द) व सदस्य किरण गुरव (खेरवसे) यांनी व अन्य सदस्य यांनी सरकारी योजनांची कामे खोडसाळ कागदपत्रे तयार करून स्वतःच्या कुटुंबातील मुलगा, पत्नी व मुलींच्या नावाने मंजूर करून स्वतः मक्तेदारी घेतली. शासकीय नियमांची पायमल्ली करून मनमानी कारभार केला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
पंचायत समिती प्रशासनाने पाठविलेला प्रतिनिधी यांनी आजच चौकशी करून अहवाल द्यावा, असा आग्रह नागरिकांनी धरल्याने सकाळी 10.30 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत बेनी खुर्द-खेरवसे ग्रामपंचायत येथे चौकशी प्रक्रिया सुरू होती. तो पर्यंत ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठाण मांडून होते. चौकशीअंती अधिकारी यांनी अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठवणार असल्याचे ग्रामस्थांना सांगितल्यानंतर ग्रामस्थांची भूमिका मावळली.