काव्या मारनसाठी 5 फेब्रुवारी 2025 हा दिवस दुहेरी आनंदाचा ठरला. कारण या दिवशी तिला एक नाही दोन गुड न्यूज मिळाल्या. आधी तिने 1000 कोटी रुपये खर्च करुन इंग्लंडची लीग ‘द हण्ड्रेड’मध्ये टीम विकत घेतली. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेतील T20 लीगमध्ये अडचणीत असलेल्या तिच्या टीमला फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग सापडला. 5 फेब्रुवारीला एलिमिनेटर सामना जिंकून फायनलमध्ये पोहोचण्याची अपेक्षा कायम ठेवली. SA20 मध्ये काव्या मारनची टीम सनरायजर्स ईस्टर्न कॅपने एलिमिनेटर मॅचमध्ये जोबर्ग सुपरकिंग्सला पराभूत केलं.
एलिमिनेटर सामन्यात सनरायजर्स ईस्टर्न कॅपने आधी फलंदाजी केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 184 धावा केल्या. सनरायजर्सकडून त्यांचा कॅप्टन एडन मारक्रमने कमालीची बॅटिंग केली. त्याने 40 चेंडूत 62 धावा केल्या. कॅप्टन मारक्रमने 6 चौकार आणि दोन षटकार लगावले. सनरायजर्सच्या टीममधील प्रत्येक फलंदाजाने डबल डिजिटमध्ये धावा केल्या.
फायनल गाठण्याची संधी
जोबर्ग सुपरकिंग्ससमोर विजयासाठी 185 धावांच टार्गेट होतं. पण या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 7 विकेट गमावून 152 धावा केल्या. 32 धावांनी सनरायजर्सने ही मॅच जिंकली. एलिमिनेटर मॅच असल्यामुळे या पराभवासह जोबर्ग सुपरकिंग्सच आव्हान संपुष्टात आलं. या विजयासह सनराइजर्स ईस्टर्न कॅपचा क्वालिफायर 2 मध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. आता ही मॅच जिंकून फायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे. सनरायजर्सला एलिमिनेटर मिळालेल्या विजयाचं श्रेय कॅप्टन एडन मारक्रमला जातं.
नवीन कुठली टीम विकत घेतली?
काव्या मारनसाठी SA20 मध्ये सनराइजर्स ईस्टर्न कॅपला एलिमिनेटरमध्ये मिळालेला विजय दुहेरी आनंदासारखा आहे. आधी तिने इंग्लंडमधील द हण्ड्रेड लीगमधील टीम विकत घेतली. 100 चेंडूंचा हा फॉर्मेट आहे. नॉर्दर्न सुपर चार्जर्सचा 100 टक्के हिस्सा विकत घेण्यासाठी 1000 कोटी रुपये मोजले.