Published on
:
06 Feb 2025, 6:31 am
Updated on
:
06 Feb 2025, 6:31 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपच्या नावाखाली मुस्लिम बांधवांमध्ये विरोधी पक्षांकडून भीती निर्माण केले जात आहे, असा आरोप करत मुस्लिम मतदार भाजपला मतदान करत नाहीत, ही समजूत खोटी ठरविण्यासाठी मी भाजपला मतदान केले आहे. मी माझा व्हिडिओही व्हायरल केला आहे, असे ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजित रशिदी यांनी वृत्तसंस्था 'ANI' शी बोलताना सांगितले .
भाजपच्या नावाखाली मुस्लिमांमध्ये भीती निर्माण केली जात आहे
दिल्ली विधानसभेसाठी बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी मतदान झाले. यानंतर 'एएनआय'शी बोलताना ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजित रशिदी म्हणालेकी, मुस्लिम मतदार भाजपला मतदान करत नाहीत असा समज विरोधी पक्षांकडून पसरवला गेला आहे. हा समज खोटा ठरवत मी भाजपला मतदान केले आहे. भाजपच्या नावाखाली मुस्लिमांमध्ये भीती निर्माण केली जाते म्हणून मी माझा व्हिडिओही व्हायरल केला आहे.
मी भाजपमध्ये सहभागी झालेलो नाही....
भाजप सत्तेत आल्यास ते मुस्लिमांचे हक्क हिरावून घेतील, अशी भीती विरोधी पक्षांकडून मुस्लिम बांधावांच्या मनावर बिंबवली जात आहे. मी भाजपला मतदान केले याचा अर्थ मी भाजपमध्ये सामील झालो आहे, असे नाही. तसेच मी भाजपला शरण आलो आहे, असेही याचा अर्थ होत नाही. भाजपचे धोरण मुस्लिमांविरोधात असेल तर मी त्याला विरोध करेन, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
... तर आम्ही भाजपला सवाल करू
भाजपच्या हाती विकलो गेलो आहे, असा आरोप माझ्यावर होत आहे. मी कोणत्याही भाजप नेत्याला भेटलेलो नाही. माझ्यावर अनेक खटले दाखल आहेत. मी भाजपला मतदान करण्यामागील एकमेव हेतू हा मुस्लिमांच्या मनातून भाजपबाबतची भीती काढून टाकणे आहे. आमच्याविरुद्ध धोरण राबवले गेले तर आम्ही भाजपविरुद्ध सवाल उपस्थित करू, असेही साजित रशिदी यांनी स्पष्ट केले.