जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथील तात्पुरत्या उपचार केंद्राला भेट देऊन विषबाधा झालेल्या रुग्णांची विचारपूस केली. Pudhari Photo
Published on
:
06 Feb 2025, 8:20 am
Updated on
:
06 Feb 2025, 8:20 am
कुरुंदवाड: पुढारी वृत्तसेवा : शिवनाकवाडी (ता. शिरोळ) विषबाधा प्रकरणी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तात्पुरत्या उपचार केंद्राला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करत रुग्णांची विचारपूस केली. त्यांनी आयजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांची प्रकृती जाणून घेतली. आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आणि आवश्यक असलेल्या सर्व सुविधा पुरवण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे. कोणत्याही प्रकारची कमतरता पडू दिली जाणार नाही, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेषत: विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला तत्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.
यात्रा-जत्रांमध्ये अधिक दक्षता घेण्याच्या सूचना जारी करणार: जिल्हाधिकारी
अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी जिल्ह्यातील यात्रा, जत्रा आणि धार्मिक सोहळ्यांमध्ये योग्य ती दक्षता घेतली जाणार आहे. सायंकाळपर्यंत यासंबंधी अधिकृत सूचना जाहीर केल्या जातील. विशेषतः लोक मोठ्या प्रमाणात जमत असलेल्या ठिकाणी खाद्यपदार्थांची तपासणी काटेकोरपणे केली जाणार आहे. अशा ठिकाणी स्वच्छता आणि सुरक्षिततेचे नियम पाळले जात आहेत का, यावर प्रशासनाचे विशेष लक्ष राहील, असे ते म्हणाले.