Published on
:
06 Feb 2025, 10:45 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : ट्रेड वॉरची चिंता कायम असताना आरबीआयच्या पतधोरण निर्णयापूर्वी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. परिणामी भारतीय शेअर बाजारात आज गुरुवारी (दि. ६) सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. सेन्सेक्स २१३ अंकांनी घसरून ७८,०५८ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ९२ अंकांच्या घसरणीसह २३,६०३ वर स्थिरावला.
आज विशेषतः रियल्टी आणि एफएमसीजी शेअर्समध्ये विक्री दिसून आली. निफ्टी रियल्टी २.१ टक्के घसरला. तर निफ्टी FMCG निर्देशांक सुमारे १ टक्के खाली आला. बीएसई मिडकॅप ०.८ टक्के घसरला. तर स्मॉलकॅप सपाट पातळीवर बंद झाला.
सेन्सेक्सवर भारती एअरटेल, टायटन, एनटीपीसी, एसबीआय, आयटीसी, टाटा स्टील, पॉवर ग्रिड हे शेअर्स १ ते २ टक्के घसरले. तर अदानी पोर्ट्स, इन्फोसिस, टेक महिंद्रा, ॲक्सिस बँक हे शेअर्स तेजीत राहिले.
निफ्टीवर ट्रेंटचा शेअर्स ८ टक्के घसरला. त्याचबरोबर भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारती एअरटेल, टायटन, ओएनजीसी हे शेअर्स २ ते ३ टक्के घसरले. तर सिप्ला, अदानी पोर्ट्स, आयटीसी हॉटेल्स, डॉ. रेड्डीज, एचडीएफसी लाईफ हे शेअर्स १ ते २.५ टक्क्यांपर्यंत वाढले.
RBIच्या पतधोरण निर्णयाकडे लक्ष
आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या पहिल्या पतधोरण निर्णयाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. ते उद्या पतधोरण जाहीर करतील. हा निर्णय बाजाराची पुढील दिशा निश्चित करू शकतो, असे बाजारातील विश्लेषकांचे म्हणणे आहे. आरबीआयकडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात होण्याची शक्यता आहे.