Published on
:
06 Feb 2025, 2:19 pm
Updated on
:
06 Feb 2025, 2:19 pm
नागपूर : राज्यभरात डोकेदुखी ठरलेल्या बर्ड फ्ल्यूचा शहरातही शिरकाव झाला आहे. मोठा ताजबाग परिसरातील काही कोंबड्यांचा अलीकडेच झालेला मृत्यू बर्ड फ्ल्यूने झाल्याचे जिल्हा प्रशासनाने अखेर स्पष्ट केले आहे. बाधित क्षेत्रातील कोंबड्यांच्या, अंड्यांच्या खाद्य खरेदी विक्री वाहतूकीस, बाजारात विक्रीस पुढील 11 दिवसापर्यंत प्रतिबंध लावण्यात आले आहेत. यामुळे मांसाहारी खवैय्यानी पुरेशी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांनी प्रतिबंधा सह परिसर निर्जंतुक करण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वी मोठा ताजबाग परिसरातील काही कोंबड्यांचा मृत्यू झाला. यामध्ये कोंबड्यांचे नमुने भारतीय कृषी संशोधन परिषद, राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था आनंदनगर भोपाळ तसेच रोग अन्वेषण विभाग पुणे येथे पाठवण्यात आले होते. हे नमुने एच 5, एन 1या एव्हीयन इन्फ्लुएंझा बर्ड फ्ल्यूचे सकारात्मक असल्याचे सिध्द झाले. यानंतर मोठा ताजबाग व त्या आसपासचे एक किलोमीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला जात आहे. बाधित क्षेत्रापासून 9 किलोमीटर त्रिज्येतील परिसर हा निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला असून बाधित क्षेत्रातील सर्व कोंबड्यांची तसेच निगडित खाद्य पदार्थांची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत आदेश धडक कृती दलास देण्यात आले आहेत.