'मढी-मायंबा रोप-वेसाठी पाठपुरावा करणार'Pudhari
Published on
:
06 Feb 2025, 8:37 am
Updated on
:
06 Feb 2025, 8:37 am
मढी: मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधी स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, तसेच मढी-मायंबा रोप-वेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन एकत्रित पाठपुरावा करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले. श्रीक्षेत्र मायंबा येथे मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधी मंदिराचे भूमिपूजन बुधावारी (दि. 5) मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज अध्यक्षस्थानी होते. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, आमदार मोनिका राजळे, संयोजक आमदार सुरेश धस, विवेकानंद शास्त्री महाराज, अशोक महाराज मरकड, राधाताई सानप महाराज, मधुकर शास्त्री महाराज, बबन महाराज बहिरवाल, मंदार महाराज आदी या वेळी उपस्थित होते.
नाथ संप्रदायाने देशाला भक्तीतून मुक्तीचा मार्ग दाखवला. गुरुदेव दत्तांच्या आशीर्वादाने देशातील सर्वांत मोठी परंपरा नाथ संप्रदायाच्या रूपाने कानाकोपर्यात पोहोचली, असे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की देशाच्या संस्कृतीवर व परंपरांवर एवढी आक्रमणे होऊनही आपल्या भक्तिमार्गाने व वारकरी संप्रदायाने या सर्व परंपरा सश्रद्ध जिवंत ठेवल्या. याच श्रद्धेतून माणुसकी प्रकट होत गेली. प्रत्येकाच्या ईष्ट देवांनी करुणेचा संदेश दिला.
देवस्थान समितीने चांगली विकासकामे केली आहेत. बीड जिल्ह्यातील नारायणगड विकासाचा दुसरा टप्पासुद्धा हाती घेऊन आता मोठी विकासकामे तेथे होतील, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, की यात्रा कालावधीमध्ये मढी-मायंबा अशा दोन्ही ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते. यासाठी संपूर्ण डोंगरदर्यातून येणारा घाटरस्ता दुपदरी व मजबुतीकरण करावा, अशी मागणी यापूर्वीसुद्धा करण्यात आली होती.
हा रस्ता रुंदीकरणाचे काम प्राधान्याने हातात घेऊ. रोप-वे करण्याचा विषय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हातात आहे. त्यांच्याकडे विश्वस्त मंडळाचे शिष्टमंडळ जाऊन ती मागणी करू. त्याबरोबर मी स्वतः येईल. संप्रदायाची उपासकांची गर्दी पाहता व गरज पाहता या रोप-वेला गडकरींकडून निश्चितच मान्यता मिळेल. त्यामुळे भाविकांची मोठी सोय होणार आहे.
हा भक्त आणि भाविकांचा देश आहे. कुंभमेळ्यामध्ये 45 कोटी लोकांनी गंगास्नान केले. एखाद्या पाश्चिमात्य राष्ट्राच्या लोकसंख्येच्या बरोबरीने देशातील भाविकांनी कुंभमेळ्यात हजेरी लावली. देशाच्या कानाकोपर्यात नाथ संप्रदायाचा अवलंब करणारे संत-मंहत, भाविक दिसतात. मच्छिंद्रनाथांच्या स्थळी संधी मिळणे हेसुद्धा भाग्याचे लक्षण असून, या आशीर्वादामुळेच पुढच्या जीवनात चांगली कामे होतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
यापूर्वी मढी देवस्थान ने आपल्याला भेटीचे निमंत्रण दिले होते, परंतु पहिले दर्शन बडे बाबा म्हणजे मच्छिंद्रनाथांचे झाल्याने आता चैतन्य कानिफनाथांचे मढी येथे दर्शन घेण्यासाठी येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
प्रास्ताविकात संयोजक आमदार सुरेश धस म्हणाले, की मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी देशात एकमेव आहे. नाथांच्या पंढरीत राज्याच्या बाहुबली मुख्यमंत्र्यांचे आगमनसुद्धा भाविकांना सुखावणारे आहे. सुमारे अठरा वर्षांपूर्वी आपण देवस्थानामध्ये लक्ष घालत विविध विकासकामांचा वेग वाढवला. तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी विकासकामांसाठी दिलेले 22 कोटी रुपये रस्त्यांच्या प्रमुख कामांसाठी खर्च झाल्याने गडाकडे येणारे सर्व रस्ते अत्यंत सुस्थितीत झाले आहेत. कोविड काळात 35 केंद्र चालवत देवस्थानाने दोन कोटी रुपये भाविकांसाठी खर्च केले.
विविध विकासकामे व मूलभूत सुविधांसाठी पर्यटन विभाग व अन्य कोणत्याही शीर्षकांतर्गत किमान 25 कोटींचा निधी देवस्थानला मिळून कानिफनाथ व मच्छिंद्रनाथ देवस्थानला जोडणारा रस्ता साडेसात मीटरचा व्हावा. संपूर्ण राज्याचे श्रद्धास्थान ठरलेल्या मायंबा येथील स्थानाला शासनाने सर्वतोपरी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली.
विकासकार्यात विशेष योगदान देणार्या संतोष छाजेड, पुण्याचे वसंत शेडगे व अविनाश बलकवडे, अहिल्यानगरचे बाबासाहेब डाके, आदींचा सन्मान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. मढी देवस्थानातर्फे मुख्यमंत्र्यांना आमदार राजळे यांच्या नेतृत्वाखालील विश्वस्त मंडळाने विविध मागण्यांचे निवेदन दिले.
मच्छिंद्रनाथ देवस्थानाचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के व कोषाध्यक्ष रमेश ताठे, उपाध्यक्ष बाबासाहेब म्हस्के माजी सरपंच राजेंद्र म्हस्के, साहेबराव म्हस्के, नवनाथ म्हस्के, सरपंच शशिकला चंदनशिव यांच्यासह सर्व विश्वस्तांनी मान्यवरांचे स्वागत केले पारंपरिक वाद्ये व बँड पथकाने वाजविलेली विविध भजने लक्षवेधी ठरली.