पुणे – नाशिक या दोन महाशहरांना जोडणारा सेमी हायस्पीड रेल्वेचा प्रकल्प गेली अनेक वर्षे विविध कारणांना रखडला आहे. या प्रकल्पाच्या प्रस्ताविक मार्गाला जीएमआरटी प्रकल्पाने विरोध केला केला होता. आता या प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आहे. या रेल्वे मार्गाचा प्रस्ताविक मार्ग कायम ठेवावा त्यात बदल करू नये अशी मागणी कोल्हे यांनी रेल्वेमंत्र्यांना केली आहे. यासंदर्भात रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून या प्रकरणता लवकरच संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले असल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.
पुणे – पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही मूळ आरेखनानुसारच व्हावी, यासाठी जीएमआरटी आणि रेल्वेच्या तंत्रज्ञांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन आज केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत हा रेल्वे प्रकल्प मध्य रेल्वे राबविणार असल्याचे स्पष्ट करीत संयुक्त बैठक आयोजित करण्याचे रेल्वेमंत्र्यांनी मान्य केल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे.
गेल्या काही वर्षांपासून पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची चर्चा सुरु आहे. या आधी महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने या रेल्वेचा डीपीआर तयार केला होता. या डीपीआरला केंद्रीय कॅबिनेटच्या मंजुरी मिळालेली नव्हती. या प्रकल्पासाठी नाशिकच्या देवस्थानाची जागा मिळत नव्हती नंतर जीएमआरटी या महाकाय दुर्बिणीच्या प्रकल्पाने जागा देण्यास विरोध केल्याने हा प्रकल्प सुरु होण्यापूर्वीच बारगळा आहे.
जीएमआरटी प्रकल्पच स्थलांतरित करण्याची मागणी
खोडदच्या जीएमआरटी प्रकल्पाने महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या डीपीआरला आक्षेप घेतल्याने रेल्वेमंत्री वैष्णव यांनी या प्रकल्पाचा डीपीआर रद्द करुन नव्याने आखणी करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनास दिले होते. त्यानुसार या सेमी हायस्पीड रेल्वेच्या मार्गात बदल करुन अहिल्या नगर, शिर्डी मार्गे नाशिक असा नवा मार्ग प्रस्तावित करण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते. मात्र या नवीन मार्गाला खासदार डॉ. कोल्हे यांनी विरोध दर्शवत जीएमआरटीच्या तंत्रज्ञांनी तोडगा काढावा अन्यथा जीएमआरटी प्रकल्पच स्थलांतरित करण्याची मागणी केली होती.
पुणे ते अहिल्या नगर, शिर्डी मार्गे नाशिक या रेल्वे मार्गास खेड, आंबेगाव, जुन्नरसह नगर जिल्ह्यातील संगमनेरसह अनेक गावांतील शेतकरी आणि लोकप्रतिनिधींचा विरोध आहे. मूळ मार्ग बदलल्यास आंदोलन करण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. मूळ रेल्वेमार्ग हा या भागातील जनतेची भाग्यरेषा बदलणारा असून आजवर विकासापासून वंचित राहिलेल्या या भागाचा विकास या रेल्वेमार्गामुळे होणार आहे, ही भूमिका खासदार डॉ. कोल्हे यांनी मांडली आहे.
मध्य रेल्वे राबविणार प्रकल्प
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून खासदार डॉ. कोल्हे यांनी आज रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेऊन पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग बदलू नये अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर महारेल, रेल्वे आणि जीएमआरटी तंत्रज्ञांची संयुक्त बैठक आयोजित करुन तोडगा काढण्याची मागणी केली. यावेळी वैष्णव यांनी हा प्रकल्प मध्य रेल्वेच करणार असल्याचे स्पष्ट करतानाच प्रकल्पात कोणतीही राजकीय अडचण येणार नाही असे आश्वासन दिले. तसेच मध्य रेल्वे आणि जीएमआरटीच्या तंत्रज्ञांची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे मान्य केले.