Published on
:
06 Feb 2025, 2:24 pm
Updated on
:
06 Feb 2025, 2:24 pm
नागपूर : नागपूर विभागातील 6000 कोटी आणि राज्यातील सुमारे 64,000 कोटी रुपयांची थकबाकी सरकारकडून घेणे असल्याच्या कारणावरून आर्थिक संकटात सापडलेल्या कंत्राटदरानी विविध विभागांची सुरू असलेली बांधकाम कामे थांबवली आहेत. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ, नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन आणि विविध संघटनांनी एकत्र येत काम सुरू असलेल्या ठिकाणी धडक दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागांच्या थकबाकी विरोधात बुधवारी आणि गुरुवारी कामे थांबवल्याने याचा फटका अनेक कामांना बसला. अलीकडेच थेट अधिकाऱ्यांना कामे वेळेत करा अशी तंबी देणारे महसूल मंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रविभवनातील कॉटेज क्रमांक 11 मध्ये नवीन कार्यालय स्थापन करण्यात येत आहे. मंत्र्यांचा कक्ष, स्विय सहाय्यक, कर्मचाऱ्यांचे कक्ष अभ्यागतासाठी प्रतीक्षा शेड, विद्युत व्यवस्था अशी इतर कामे सुरू असताना संघटनेच्या नेत्यांनी रविभवनात जात हे काम थांबवले . यासोबतच जिल्हाधिकारी कार्यालयातील नूतनीकरणाचे कामही थांबले.
ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या जुन्या कार्यालय परिसरात उपजिल्हाधिकाऱ्यांसाठी व्यवस्था करण्यात येत आहे. ही सर्व कामे देखील प्रभावित झाली. विभागीय आयुक्तालयातील कामही एक-दीड महिन्यापासून थांबले आहे. एकंदरीत पालकमंत्री कार्यालयासह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच अनेक ठिकाणच्या बांधकामांना या कंत्राटदारांच्या काम बंद आंदोलनाचा फटका बसला आहे.
सरकारने तातडीने थकबाकीची देयके जारी करावी अशी मागणी करणारे निवेदन विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी अधीक्षक अभियंत्याना देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे विदर्भ व नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष सुबोध सरवदे यांनी दिली. महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघातर्फे 10 फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथे होणाऱ्या बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.