कालव्यात बुडालेल्या शाळकरी मुलाचा मृतदेह सापडला
Published on
:
06 Feb 2025, 2:40 pm
Updated on
:
06 Feb 2025, 2:40 pm
नायगाव : कालव्यात बुडालेल्या रितेश मारोती सुर्यवंशी या शाळकरी मुलाचा मृतदेह गुरुवारी (दि.६) सकाळी सापडला. बुधवारी तो आपल्या मित्रांसोबत पोहायला गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला होता. त्यानंतर शोधाशोध करूनही त्याचा मृतदेह सापडला नाही. गुरूवारी त्याचा मृतदेह पाण्यात मिळून आला. त्यानंतर पोलिसांनी नायगाव ग्रामीण रुग्णालयात शवविचछेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
नायगाव येथील सामाजिक वसतिगृह येथे राहून जनता हायस्कूल नायगाव बा. येथे शिक्षण घेणारा रितेश आपल्या मित्रांसोबत वसतिगृह व शाळेच्या जवळ असलेल्या कालव्यात पोहायला गेले होते. यादरम्यान त्याचे मित्र आदित्य कागडे, राजप्रिय कागडे, विशाल गायकवाड, भारत वाघमारे हे पाण्यातून बाहेर आले, मात्र रितेश बाहेर आला नाही. त्यानंतर मित्रांसह नातेवाईकांनी रात्रभर त्याचा पाण्यात शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. सकाळी त्याचा मृतदेह माजी नगरसेवक देविदास बोमनाले यांच्या शेताजवळ पाण्यात मिळून आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. व नायगाव ग्रामीण रुग्णालयात शवविचछेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.