सिनेइंडस्ट्रीतील स्टार किड्सच्या पदार्पणाबद्दल नेहमीच आकर्षण असतं. यामध्ये आता सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि मुलगी सुहाना खानही आहे. सुहानानंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यनही आता लवकरच बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाला आहे.
आर्यन खानच्या ‘द बीए***डीएस ऑफ बॉलिवूड’ चा टीझर रिलीज
आर्यन खानच्या ‘द बीए***डीएस ऑफ बॉलिवूड’ या वेब सीरिजचा टीझर रिलीज झाला आहे. आर्यन खान त्याच्या डेब्यू सीरिजमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. विशेष म्हणजे आर्यन अभिनेता म्हणून नव्हे तर दिग्दर्शक म्हणून मनोरंजन विश्वात प्रवेश करणार आहे. दरम्यान रिलीज झालेल्या टीझरची चर्चाही प्रचंड आहे.
आर्यन दिग्दर्शकाच्या खुर्चीवर तर शाहरूखचा अभिनय
या व्हिडीओमध्ये पहिल्यांदाच शाहरुख खानसोबत लेक आर्यन खानही दिसत आहे. आर्यन दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसलेला दिसतोय. तर समोर शाहरूख अभिनय करताना दिसत आहे. पण या व्हिडीओमध्ये असंही दिसत की आर्यन खान शाहरूखला इतका वैताग आणतो की, तो अक्षरश: त्याला मारायला त्याच्यामागे धावतो. तेही अख्ख्या क्रु मेंबरसमोर. नक्की असं काय घडलं की शाहरूखला आर्यनचा एवढा राग आला.
शाहरुख खानला द्यायला लावले एकामागोमाग एक टेक
टीझरमध्ये दाखवण्यात आलं आहे की, शाहरुख एक धमाकेदार एन्ट्री करताना दिसतो आणि म्हणतो, “चित्रपट वर्षानुवर्षे रखडलेलाच आहे, पण…” पण त्याची डायलॉग डिलीव्हरी आर्यनला आवडत नाही. दिग्दर्शकाच्या खुर्चीवर बसलेला आर्यन त्याला दुसरा टेक घेण्यास सांगतो. शाहरूखच्या डायलॉग घेण्यात आर्यन काहीना काही सतत चुका काढत राहतो आणि त्याला वारंवार टेक घेण्यास सांगतो. हा क्रम सुरूच राहतो. शाहरुख टेक मागोमाग टेक घेत राहतो.
अखेर शाहरुख रागावला अन् मारायला धावला
अखेर शाहरुख रागावतो आणि ओरडतो, तो त्याला म्हणतो “चुप राहा, हे तुझ्या वडिलांचं राज्य आहे का?” त्यानंतर आर्यनची एक झलक दिसते. आर्यन हसतो आणि उत्तर देतो, “हो.” त्यानंतर शाहरुख म्हणतो, “आता मी जसं म्हणेल तसच होणार आणि तुम्ही सर्वजण शांतपणे ते पाहायचं.” मग शाहरुख त्याच्या पद्धतीने त्याचे डायलॉग घेतो.
पण त्यानंतरही आर्यन त्याच्या खुर्चीवरून उठतो आणि म्हणतो की कॅमेरा फिरलाच नव्हता, आपल्याला आणखी एक टेक घ्यावा लागेल. त्यानंतर मात्र शाहरुख चांगलाच रागावलेला दिसतो आणि तो त्याच्या मागे मारण्यासाठी धावतो. त्यानंतर, आर्यन म्हणतो, ” तुमच्या मुलावर हात उचलण्यापूर्वी…” असं म्हणत तो पळून जातो.
बाप-लेकाची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस
तुमच्या लक्षात आलं असेलच की शाहरूख त्याच्या मुलाच्या मागे त्याला मारायला धावतो वैगरे हे सर्व प्रमोशनचा भाग आहे. पण पहिल्यांदाच पडद्यावर दिसणारी ही वडील-मुलगी जोडी प्रेक्षकांना फार आवडली. प्रेक्षकांना या जोडीला प्रचंड पसंती दर्शवली आहे.