परभणी (Parbhani):- नागरीकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी १ मे २०२३ पासून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thakre) आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यात एकूण दहा ठिकाणी सदरचे रुग्णालय सुरू आहेत. या रुग्णालयात ३१ जानेवारी २०२५ पर्यंत ६४ हजार ६७४ रुग्णांनी उपचार घेतले आहेत.
परभणी जिल्ह्यात दहा ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात आला
आपला दवाखाना या योजनेंतर्गत तालुका आणि शहरी भागात रुग्णालय (Hospital)सुरू करण्यात आले आहेत. मोफत वैद्यकीय तपासणी, किरकोळ जखमांवर मलमपट्टी, औषधोपचार या सोबत विविध प्रकारच्या रक्तचाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. परभणी शहरात चार ठिकाणी आपला दवाखाना सुरू आहे. साधारणत: २५ ते ३० हजार लोकसंख्येच्या मागे १ या पध्दतीने रुग्णालय सुरू करण्यात येत आहेत. सायंकाळच्या सुमारास रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आपला दवाखान्याची वेळ दुपारी दोन ते रात्री दहा अशी ठेवण्यात आली आहे. ग्रामीण व शहरी भागात अशा ठिकाणी सदर रुग्णालय सुरू करण्यात येत आहेत ज्या ठिकाणी रुग्णांना तात्काळ आरोग्य सुविधा देता येईल. आपला दवाखाना मार्फत ६४ हजार ५७४ रुग्णांनी उपचार घेत लाभ घेतला आहे.
दवाखान्यात गरजू रुग्णांवर आवश्यक उपचार करण्यात येणार आहे
परभणी जिल्ह्यात तालुकास्तरावर देखील “आपला दवाखाना” सुरू करण्यात आला आहे. गंगाखेड येथील रुग्णालयात १२ हजार ८६१, मानवत १२ हजार ६३२, पाथरी ६ हजार ४६४, पूर्णा ७ हजार ५४५, सेलू ११ हजार २०१ आणि सोनपेठ येथील रुग्णालयात ९ हजार ९५५ रुग्णांनी उपचार घेतले आहेत. परभणी शहरात चार ठिकाणी रुग्णालय सुरू आहे. अपना कॉर्नर येथील रुग्णालयात २ हजार ७२५, शिवनेरी नगर येथे ७७२, सिध्दीविनायक नगर कारेगाव नगर येथे ४१९ रुग्णांनी उपचार घेतले आहेत. तर गुलजार कॉलनी धार रोड येथे नुकताच आपला दवाखाना सुरू करण्यात आलेला आहे.
रुग्णालयात गरोदर माता, लहान मुलांची तपासणी
आपला दवाखान्यात गरोदर महिला, लहान मुलांवर देखील उपचार करण्यात येत आहेत. ३१ जानेवारी पर्यंत ९२४ गरोदर माता, लहान मुलांची तपासणी करण्यात आली. त्याच प्रमाणे ५ हजार ९८७ रुग्णांच्या रक्त व इतर तपासण्यात करण्यात आल्या आहेत.