लीग क्रिकेटमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेट यामधील अंतर कमी झाले, असे स्पष्ट मत मुंबई इंडियन्स संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक झुलन गोस्वामी यांनी ‘सामना ऑनलाईन’शी व्यक्त केले.
महिला खेळाडूंना लीग क्रिकेटचा चांगलाच फायदा होत आहे. प्रामुख्याने नवीन खेळाडूंना याचा खुपच फायदा होत असल्याचे त्या म्हणाल्या. खेळात आक्रमकता महत्त्वाची आहे, मात्र कधी सावध आणि कधी आक्रमक पवित्र घ्यायला हवा हे समजून घ्यायला पाहिजे, असा सल्लाही झुलन गोस्वामी यांनी तरुण खेळाडूंना दिला. वुमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या हंगामाच्या निमित्त मुंबई इंडियन्सची बुधवारी पत्रकार परिषद झाली.
त्या पुढे म्हणाल्या की, आक्रमता प्रत्येक खेळाडूकडे असते. पण ही आक्रमकता नेमकी कधी दाखवावी हे देखील महत्त्वाचे आहे. परिस्थितीनुसार आपल्या खेळात बदल करणे आवश्यक असून कोणत्या क्षणी आक्रमक पवित्रा घ्यावा आणि कधी सावध खेळ करावा हे समजून घेता आले पाहिजे.
वन डे वर्ल्डकपच्या तयारीत WPL महत्त्वाची भूमिका बजावेल, हरमनप्रीत कौरनं व्यक्त केला विश्वास
एकाच पवित्र्यामध्ये तुम्ही कायम खेळ करू शकत नाही. खेळात चढ-उतार येतात आणि त्यानुसार आपला पवित्राही बदलावा लागतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेगाने बदलत असून डब्ल्यूपीएलमध्ये त्याचा प्रभाव दिसत आहे. स्पर्धाही वाढत असल्याने तुम्ही त्याचा सामना कसा करता हे देखील महत्त्वाचे आहे. जोपर्यंत तुम्ही बिनदास्त खेळत नाही, तोपर्यंत तुम्ही सर्वोत्तम कामगिरी करू शकणार नाहीत, असेही झुलन म्हणाल्या.