Published on
:
06 Feb 2025, 1:54 pm
Updated on
:
06 Feb 2025, 1:54 pm
नागपूर : गेले काही दिवस काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून राजकारण सुरू असतानाच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः आपण देखील याविषयीची प्रतीक्षाच करीत असल्याचे सांगत इतर इच्छुकांची शिफारस करण्याची भूमिका घेतली आहे. पटोले यांनी आपण निवडणुकीनंतर लगेचच प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याबाबत हाय कमांडला कळविले होते. जबाबदारीतून मुक्त करावे अशी मागणीही केली.आजही आपण नव्या प्रदेशाध्यक्षांची प्रतीक्षा करीत असल्याचे सांगितले.
दरम्यान, माजी मंत्री काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांनी हायकमांडने सांगितल्यास आपण प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारण्यास तयार असल्याची भूमिका माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. राज्यातील प्रश्नांवर संघर्ष करणारा,लढवय्या प्रदेशाध्यक्ष हवा असेही त्यांनी मत व्यक्त केले. यावरून त्यांची प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा लक्षात आली. आता या संदर्भात स्वतः नाना पटोले यांनी देखील पक्ष श्रेष्ठींनी विचारणा केल्यास डॉ. नितीन राऊत यांच्या नावाची आपण देखील शिफारस करू अशी सबुरीची भूमिका घेतली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार, नाना पटोले यांना गट नेता केले जाणार अशी गेले काही दिवस चर्चा आहे. माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर,विश्वजीत कदम, सतेज पाटील, अमित देशमुख अशी काही नावे प्रदेशाध्यक्ष पदासाठी राज्यातील काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर चर्चेत आहेत. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लगेच होण्याची शक्यता लक्षात घेता हा बदल टाळल्याची माहिती सूत्रांनी दिली. आता या निवडणुका देखील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सतत लांबणीवर पडत असल्याने दिवाळीनंतर होतील असे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर नव्या अध्यक्षाला देखील पुरेसा वेळ मिळू शकतो. एकंदरीत गेले काही दिवस युवक काँग्रेसमधील तापलेले राजकारण, तडकाफडकी 60 पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करणे, यातील नेता पुत्र असलेल्या काहींना अभय मिळणे लक्षात घेता काँग्रेसमध्ये संघटनात्मक फेरबदलाचे वारे जोरात आहेत.