आरटीई प्रवेशासाठी १० फेब्रुवारी रोजी लॉटरीpudhari photo
Published on
:
06 Feb 2025, 4:23 pm
Updated on
:
06 Feb 2025, 4:23 pm
पुणे : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार, दरवर्षीप्रमाणे 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन 2025-26, शैक्षणिक वर्षासाठी आरटीई 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सोडत (लॉटरी) सोमवार (दि.10) सकाळी 11.00 वाजता महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरण येथे काढण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिकचे संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. याअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश घेता येतो. आरटीईअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती राज्य सरकारकडून शाळांना करण्यात येते. यंदा राज्यभरातील 8 हजार 863 शाळांमध्ये प्रवेशासाठी 1 लाख 9 हजार 111 जागा उपलब्ध झाल्या आहेत. या प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी 14 ते 27 जानेवारीची पहिली मुदत तर 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी अशी दुसरी मुदत देण्यात आली होती. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ न देता येत्या 10 फेब्रुवारीला लॉटरी काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच साधारण 15 फेब्रुवारीपासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आरटीई संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार 3 लाख 5 हजार 161 विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले. यातील किती विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळते हे येत्या सोमवारी स्पष्ट होणार आहे.