केस निरोगी, मऊ आणि सुंदर ठेवण्यासाठी लोक विविध प्रकारचे केसांचे प्रोडक्ट वापरत असतात, तर काहीजण घरगुती उपचार वापरतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की केस वाळवण्याच्या पद्धतीचा तुमच्या केसांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. केस वाळवण्याची सामान्य पद्धत म्हणजे एअर ड्राय आणि ब्लो ड्राय. या दोन पद्धतीनेच शक्यतो आपण केसं वाळवतो.
पण प्रश्न असा आहे की यापैकी कोणती पद्धत चांगली आहे? हेअर ड्रायर तुमचे केस लवकर सुकवतो पण त्यासोबत नुकसान करतो का? किंवा केसांसाठी एअर ड्राय जास्त फायदेशीर आहे का? जर तुम्हीही अशाच गोंधळात असाल, तर या दोन्ही पद्धतींमध्ये काय फरक आहे, त्यांचे फायदे आणि तोटे काय आहेत आणि तुमच्या केसांसाठी कोणती पद्धत चांगली असू शकते ते जाणून घेऊयात.
एअर ड्राय पद्धतीने केस वाळवणे
एअर ड्राय पद्धतीने केस वाळवणे म्हणजे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या मदतीशिवाय केस नैसर्गिकरित्या सुकू देणे. ज्याने केसांचे कमी नुकसान होते आणि केस निरोगी राहण्यासही मदत होते.
एअर ड्रायचे फायदे
हीट डॅमेजपासून केसांचे संरक्षण होते: जेव्हा तुम्ही तुमचे केस नैसर्गिकरित्या तुम्ही वाळवाल तेव्हा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारच्या हीटचा परिणाम होत नाही. ज्यामुळे तुमचे केस दीर्घकाळ निरोगी राहतात. केसांमधील मॉइश्चर टिकून राहतो. एअर ड्रायर केस वाळवण्याची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. हवेत वाळवल्याने केसांचा नैसर्गिक ओलावा टिकून राहिल्याने ते कमी कोरडे होतात.
केस गळती कमी: केस नैसर्गिकरित्या हवेत किंवा सूर्यप्रकाशात वाळवल्याने हीटपासून तर बचाव होतोच. केसांची मुळे मजबूत राहतात, ज्यामुळे केस गळतीसारख्या समस्या देखील कमी होण्यास मदत होते.
एअर ड्रायचे तोटे
विशेषतः हिवाळ्यात आणि दमट वातावरण असल्यावर एअर ड्रायचे तोटे नक्कीच जाणवतात. शिवाय अशावेळी तुमचे केस नैसर्गिकरित्या सुकण्यासाठी खूप वेळ लागतो . अशा परिस्थितीत, जर तुम्हाला लवकर कुठेतरी जायचे असेल तर तुम्हाला उशीर होऊ शकतो. केस नैसर्गिकरित्या हवेत किंवा उन्हात वाळवल्याने केसांचा पोत काही परिस्थितीत खराब होऊ शकतो.
ब्लो ड्रायिंगचे फायदे आणि तोटे
दुसरी पद्धत आहे ब्लो ड्राय करणे. म्हणजे हेअर ड्रायर किंवा इतर स्टायलिंग टूल्सच्या मदतीने केस वाळवणे आणि स्टायलिंग करणे. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल , तुम्ही घाईत असाल तर ही पद्धत तुमच्यासाठी चांगली आहे.
ब्लो ड्रायिंगचे फायदे
केस लवकर सुकतात. हेअर ड्रायरने केस काही मिनिटांतच सुकतात, ज्यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि कुठेही जाण्यापूर्वी तुम्ही तुमचे केस लवकर स्टाईल करू शकता.
थंड हवामानात अधिक फायदेशीर : हिवाळ्यात हवेत केस वाळवण्यास उशीर लागतो आणि ते पूर्णपणे सुकत नाही. ज्यामुळे आजारी पडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत ब्लो ड्राय हा एक चांगला पर्याय आहे.
ब्लो ड्रायर योग्य प्रकारे वापरले तर केसांमध्ये गुंता फार कमी होतो शिवाय केस फ्रिजी होत नाही. ज्यामुळे केस व्यवस्थित दिसतात आणि तुम्ही ते कोणत्याही प्रकारे स्टाईल करू शकता.
ब्लो ड्रायिंगचे तोटे
हीटमुळे होणाऱ्या नुकसान होण्याची शक्यता असते. ब्लो ड्रायिंगमुळे केसांना जास्त हीट मिळते. हेअर ड्रायरचा सतत वापर केल्याने केस कोरडे आणि कमकुवत होऊ शकतात. याचा केसांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. जर केस वारंवार ब्लो ड्राय केले तर केस सहजपणे तुटू शकतात, त्यामुळे ब्लो ड्रायचा कमीत कमी वापर करणे कधीही चांगले.
केस निरोगी ठेवण्यासाठी कोणती पद्धत चांगली आहे?
हे पूर्णपणे तुमच्या केसांचा प्रकार, हवामान आणि गरजांवर अवलंबून असते. जर तुमचे केस पातळ, कोरडे किंवा कमकुवत असतील तर हवेत वाळवणे हा एक चांगला पर्याय आहे कारण ते केस नैसर्गिकरित्या सुकतात आणि त्यांचे नुकसान होत नाही.
जर तुम्हाला लवकर कुठे जायचं असेल किंवा तयारी करायची असेल किंवा हिवाळा असेल तर ब्लो ड्राय हा एक चांगला पर्याय असू शकतो. पण कमी तापमानवार केस वाळवले तर नुकसान होणार नाही.