बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांना क्लीनचिट दिली आहे. धनंजय मुंडे हा खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही. त्यांच्यासोबत मीडिया ट्रायल सुरू आहे असे विधान भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर मोठा गदारोळ पाहायला मिळाला होता. यानतंर आता बीडमधील भागचंद महाराज झांजे यांनी महंत नामदेव शास्त्री यांच्याविरोधात एक तक्रार दाखल केली आहे. “माझ्या जीवितास काही बरं वाईट झालं, तर याला भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज आणि त्यांचे अनुयायी जबाबदार राहतील”, असे त्यांनी या तक्रारीत नमूद केले आहे.
नेमकं प्रकरण काय?
भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी धनंजय मुंडेंबद्दल केलेल्या विधानानंतर बीडमधील भागचंद महाराज झांजे यांनी संविधानिक पद्धतीने प्रसारमाध्यमांना एक प्रतिक्रिया दिली होती. या प्रतिक्रियेनंतर बीडमधील भागचंद महाराज झांजे यांना महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्या अनुयायींकडून वारंवार धमक्या येत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. यानंतर त्यांनी नुकतंच बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.
महंत नामदेव शास्त्री महाराजांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मानसिकतेसंदर्भात प्रतिक्रिया दिल्यानंतर भागचंद महाराज यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. यानंतर नामदेव शास्त्री महाराज यांचे अनुयायांनी गेल्या पाच दिवसापासून फोनवरून धमक्या देत आहेत. महाराष्ट्रात फिरू देणार नाही, तंगडे तोडू, जिवे मारू, ठोकून काढू, असे फोन कॉल सुरू आहेत. त्यामुळे माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर याला महंत नामदेव शास्त्री महाराज आणि त्यांचे अनुयायी जबाबदार असतील, अशी तक्रार भागचंद महाराजांनी केली आहे.
“मी प्रतिक्रिया दिल्यानंतर मला महाराष्ट्रातून महंत नामदेव शास्त्री महाराजांच्या अनुयायांचे फोन यायला लागले. तुझी लायकी आहे का, तुझी कुवत आहे का, तुला बघतो, मारतो, अशा प्रचंड धमक्या देण्यात आल्या. मला प्रचंड मानसिक त्रास देण्यात आला. तू महाराष्ट्रात कुठेही फिर, तुला मारुनच टाकणार, अशा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. आजही एक धमकी आली. त्यात एक व्हिडीओ आला होता. त्याबद्दल मी पोलिसांना तक्रार दिली होती. उद्या माझ्या जीविताला धोका झाला तर महंत नामदेव शास्त्री महाराज आणि त्यांचे सर्व अनुयायी यासाठी जबाबदार असतील”, असे भागचंद महाराज म्हणाले.
“अनुयायी धमकी द्यायला लागले”
“तुझी लायकी आहे, तुला बघतो, तुझी पात्रता आहे का, ते किती मोठे, तुम्ही किती लहान आहात. धमकी देणार वाटेल ते बोलायचा. नीच खालच्या स्तराची शिवीगाळ केली गेली. मी त्यांचा कालही आदर करत होतो, आजही आदर करतो आणि उद्याही करेन. ते वारकरी संप्रदायाचे उच्च दर्जावर असणारे व्यक्ती आहेत. मी एक संविधानक प्रतिक्रिया दिली होती. त्यांचे अनुयायी धमकी द्यायला लागले”, असेही भागचंद महाराजांनी म्हटले.
मला जिवे मारण्याची धमकी का देता?
“महंत नामदेव शास्त्री महाराज ते आमचे आदर्श आहेत. मात्र त्यांनी वारकरी समाजाच्या ज्या भावना दुखावल्या आहेत. त्या भावनासंदर्भात त्यांनी अप्रत्यक्षपणे वेगवेगळी मतं मांडणं योग्य नाही. त्यांनी त्यांच्या अनुयायांनी योग्य ती समज द्यावी. मी संविधानिक मार्गाने प्रतिक्रिया दिली. चूक झाली असेल तर गुन्हा दाखल करा. मात्र मला जिवे मारण्याची धमकी का देता?” असा सवाल देखील बीडमधील श्री ह भ प भागचंद महाराज झांजे यांनी केला आहे.