Published on
:
06 Feb 2025, 1:32 pm
Updated on
:
06 Feb 2025, 1:32 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : Harshit Rana Record : भारताचा गोलंदाज हर्षित राणाने नागपूर वनडे आमन्यात ऐतिहासिक विक्रम नोंदवला. हा विक्रम करताना त्याने कपिल देव, जसप्रीत बुमराह आणि झहीर खान सारख्या अनेक भारतीय दिग्गजांना मागे टाकले.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना गुरुवारी नागपूरमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्माने हर्षित राणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली. हा त्याचा पहिलाच वनडे सामना होता.
तिन्ही फॉरमॅटच्या पदार्पण सामन्यात 3+ विकेट्स घेणारा पहिला भारतीय
नगपूर वनडेमध्ये हर्षितने बेन डकेट, हॅरी ब्रूक आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना आपले बळी बनवले. तिसरी विकेट घेताच त्याने ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. तो तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, वनडे, टी-20) पदार्पण करताना पहिल्या डावात 3 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. याआधी हर्षितने कसोटी आणि टी-20 मध्येही पदार्पण केले आहे.
कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
हर्षितने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हा सामना नोव्हेंबर 2024 मध्ये खेळला गेला. ज्यामध्ये हर्षितने या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 48 धावा देत 3 बळी घेतले होते. तर दुसऱ्या डावात त्याने 69 धावा देऊन 1 विकेट घेतली.
यानंतर, हर्षितने 2025 मध्ये टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 31 जानेवारी रोजी इंग्लंडविरुद्ध पहिला सामना खेळला, ज्यामध्ये त्याने 33 धावा देऊन 3 बळी घेतले. त्यानंतर 6 फेब्रुवारी रोजी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
हर्षितची आंतरराष्ट्रीय पदार्पणातील कामगिरी
कसोटी : 3/48 विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पर्थ
टी 20 : 3/33 विरुद्ध इंग्लंड, पुणे
वनडे : 3/53 विरुद्ध इंग्लंड, नागपूर
नागपूर वनडेमध्ये इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर संपूर्ण संघ 47.4 षटकांत 248 धावांवर बाद झाला. या सामन्यात हर्षित राणाने 7 षटके गोलंदाजी केली आणि 53 धावा देत 3 बळी घेतले. यादरम्यान त्याने एक षटक निर्धाव टाकले.