Published on
:
06 Feb 2025, 2:52 pm
Updated on
:
06 Feb 2025, 2:52 pm
पनवेल : घरफोडी, वाहन चोरी आणि अन्य गुन्ह्यात तळोजा जेल मधून शिक्षा भोगून बाहेर आलेल्या चोरट्यांनी अवघ्या दुसऱ्या दिवसापासून पुन्हा वाहनाची चोरी करत नवी मुंबई परिसरात धुमाकूळ घातला होता. याच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पनवेल तालुका पोलिसांना यश आले आहे. पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत या चोरट्याने एक पीक व्हॅन चोरली होती.
कौशल श्रीरंग पाटील (वय २२ ) राहणार कोप्रोली आणि रणजीत रामप्रकाश सोनी (वय ३६) राहणार कोप्रोली असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या दोन्ही आरोपींनी संगनमताने पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डेरवली येथून एका पीक अप व्हॅन ची चोरी केली होती. या प्रकरणी पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३१ जानेवारी रोजी चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्या नुसार पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक आनंद कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे, पोलिस उपनिरीक्षक हर्षद राजपूत, पोलिस हवालदार विजय देवरे, शिवाजी बाबर, सुनील कुदळे आणि पोलिसांच्या पथकाने या गुन्ह्याच्या तपासला सुरवात केली. अवघ्या पाच दिवसात या पोलिस पथकाने आरोपीच्या ठावठिकाणचा शोध लावून त्यांना अटक केली.
विशेष म्हणजे आरोपी मोबाईल फोन वापरत नसल्याने आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हानात्मक होते. मात्र पोलिसांच्या पथकाने या परिसरातील ७५ हून अधिक सीसीटीव्ही चे फुटेज चाळून आरोपीची ओळख पटवली आणि त्या नंतर आरोपीचा मागोवा घेण्यास सुरवात झाली. पनवेल पासून वाहनाचा शोध घेत पनवेल तालुक्याचे हे पोलिस पथक पनवेलहून गव्हाण पर्यंत पोचले होते, त्यामुळे आरोपी याच परिसरात असल्याचा विश्वास पोलिसांना होता. केवळ सीसीटीव्ही मुळे मिळालेल्या आरोपीच्या फोटो वरून त्यांनी शोध सुरू केला. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी तीन दिवस उलव्यामध्ये सापळा रचून ठाण मांडला होता. त्याच वेळी आरोपींना अटक करून पोलिसाना ताब्यात घेत जवळपास ४ लाख ५ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत एक रिक्षा, पिकअप व्हॅन , दोन दुचाकी आणि पाच मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत.
या पकडलेल्या आरोपींवर जवळपास १६ गुन्ह्यांची नोंद आहे. यातील अटक आरोपी कौशल पाटील हा सराईत गुन्हेगार असून नवी मुंबई पोलिस ठाण्याच्या हद्दीत जवळपास १२ गुन्ह्यांची नोंद त्यांच्यावर आहे. तसेच दुसरा आरोपी रणजित सोनी यांच्याविरोधात नाशिक आणि ठाणे येथे दोन गुन्ह्यांची नोंद आहे. हे दोघे सराईत गुन्हेगार आहे. यातील आरोपी कौशल हा तळोजा जेल मधून २१ जानेवारी रोजी शिक्षा भोगून बाहेर आला होता. बाहेर आल्या दुसऱ्या दिवसा पासून गाड्यांची चोरी तो करू लागला होता. अवघ्या दुसऱ्या दिवशी त्याने रिक्षांची चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
२३ वर्षाचा आरोपी कौशल हा दहावी पास आहे..!
२३ वर्षाचा आरोपी कौशल हा दहावी पास आहे. मात्र गेली तीन वर्ष आरोपी कौशल चोरी करण्याच्या गुन्ह्यात तळोजा जेल मध्ये शिक्षा भोगत होता. २१ जानेवारी रोजी बाहेर आल्या नंतर त्यांनी आत्ता परत जवळपास पाच मोबाईल आणि दोन दुचाकी एक रिक्षा आणि पीक अप व्हॅन ची चोरी केली होती.