मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करूणा शर्मा यांनी घरगुती हिंसाचारासंदर्भात केलेले आरोप कोर्टाकडून अंशतः मान्य, करूणा शर्मांच्या विजयावर तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया
मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करूणा शर्मा यांनी घरगुती हिंसाचारासंदर्भात केलेले आरोप कोर्टाकडून अंशतः मान्य करण्यात आलेले आहेत. या प्रकरणावरील शेवटचा निकाल येईपर्यंत धनंजय मुंडेंनी घरगुती हिंसाचार करु नये. धनंजय मुंडेंनी करुणा शर्मा यांना महिन्याला 1 लाख 25 हजार रूपयांची पोटगी द्यावी. तर त्यांची मुलगी शिवानीला दरमहा 75 हजार रूपये द्यावेत. म्हणजे एकूण दोन लाख करूणा शर्मा यांना देण्याचे आदेश कोर्टाने मुंडे यांना दिले आहेत. या खटल्याचा 25 हजाराचा खर्च धनंजय मुंडेंनी करुणा शर्मा यांना द्यावा, असेही म्हटले आहे. दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोर्टाने निकाल दिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘करुणा शर्मांना न्याय मिळाला असं म्हणावं लागेल. करुणा शर्मा वारंवार सांगत होत्या मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे. माझ्यावर घरगुती हिंसाचार झाला आहे. मला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातो. मला खर्च दिला जात नाही. कोणतीही दखल घेतली नसल्याने त्या न्यायालयात गेल्या. कोर्टाने आज त्यांना न्याय दिला. मुंडेंनी आता तरी आरोप मान्य केलं पाहिजे. कोर्टानेच त्यांना दोषी ठरवलं आहे’, असं तृप्ती देसाई म्हणाल्या. पुढे त्या असंही म्हणाल्या, धनंजय मुंडे यांचे अनेक प्रकरण समोर येत आहेत आणि पुरावे असतील तर 100 टक्के योग्य न्याय मिळेल. करुणा शर्मा या मी करुणा शर्मा नाही तर करुणा मुंडे आहे, असं सांगायच्या. त्यामुळे त्यांना आता करुणा मुंडेच म्हटलं पाहिजे, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे.
Published on: Feb 06, 2025 02:00 PM