पीएमपीचालकाने बेशिस्त चारचाकीचालकाला शिकवला धडा; व्हिडीओ व्हायरलPudhari
Published on
:
06 Feb 2025, 6:31 am
Updated on
:
06 Feb 2025, 6:31 am
पुणे: भेकराईनगर रस्त्यावर सिग्नलला झालेल्या गर्दीपासून सुटका करण्यासाठी एका चारचाकीचालकाने शक्कल लढवून वाहतूक नियमांची ऐशीतैशी करत गाडी विरुद्ध रस्त्याने पुढे काढली. मात्र, समोरून आलेल्या पीएमपीचालकाने या चारचाकीचालकास वाहतुकीचे नियम सांगत चांगलाच धडा शिकवला अन् नाइलाजास्तव चारचाकीचालकाला आपली गाडी मागे घ्यावी लागली. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत असून, पीएमपीचालकाचे कौतुक होत आहे.
पुणे शहरात आता सर्वाधिक वाहनांची कोंडी वाढत आहे. टॉमटॉम संस्थेच्या अहवालामध्ये पुणे वाहतूक कोंडीत चौथ्या क्रमांकावर आले आहे. याच वाढत्या कोंडीतून सुटका करण्यासाठी अनेकदा पुणेकर विविध शक्कल लढवत असतात. कोणी पादचारी मार्गावरून गाडी चालवतो. कोणी नो-एन्ट्रीत घुसतो तर कोणी गल्लीबोळांमधून गाड्या बाहेर काढतो.
मात्र, एका चारचाकीचालक पठ्ठ्याने पुण्यातील वाहतूक कोंडीपासून सुटका करण्यासाठी आपली कार सिग्नलला न थांबवता विरुद्ध बाजूच्या रस्त्याने पुढे काढली. मात्र, समोरून येणार्या पीएमपीचालकाने या चारचाकीचालक पठ्ठ्याला वाहतूक नियमांचा चांगलाच धडा शिकवला आणि त्याला गाडी रिव्हर्स (मागे) घ्यायला लावली. येथून जाणार्या अनेकांनी या घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला. व्हिडीओ पाहिल्यावर अनेक नेटकर्यांनी चारचाकी चालकाला कमेंटद्वारे चांगले धोपटले आणि त्याच्या अशा गाडी चालविण्याच्या पद्धतीबाबत तीव्र टीका केली.
...अशी घडली घटना
भेकराईनगर डेपोतील ई-बसवरील चालक बाळू गायकवाड हे नेहमीप्रमाणे आपल्या ड्युटीवर होते. गाडी घेऊन ते प्रवासी सेवा पुरविण्यासाठी निघाले होते. त्या वेळी त्यांच्यासमोर एका चारचाकीचालकाने बेशिस्तपणे विरुद्ध दिशेने गाडी घातली. चालक गायकवाड यांनी या वेळी चालकाला चांगलेच सुनावत गाडी मागे घेण्यास भाग पाडले.
पुणे प्रशासनासमोर आव्हान
पुणे शहराने मुंबई आणि दिल्लीलाही मागे टाकत वाहतूक कोंडीत जगात चौथा क्रमांक मिळविला आहे. ही कौतुकाची बाब नसून, याचा आगामी काळात शहरावर आणि शहरातील नागरिकांवर भीषण परिणाम होणार आहे.
वाढती वाहतूक कोंडी ही शहरासाठी हानिकारक असून, भीषण संकट निर्माण करणारी असणार आहे. ती रोखण्याचे पालकमंत्री, विभागीय आयुक्त, पुणे महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पुणे पोलिस आयुक्त, परिवहन विभाग यांच्यासह विविध यंत्रणांसमोर मोठे आव्हान असणार आहे, असे मत वाहतूकतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे.
भेकराईनगर भागात घडलेली ही घटना आहे. अशा प्रकारे नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचा भंग करू नये. असे प्रकार वाढत राहिले, तर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहनचालकांनी नेहमी वाहतूक नियमांचे पालन करावे. आमच्याकडील चालकांनासुद्धा वाहतूक नियमांचे पालन करण्याचे सक्त आदेश देण्यात आलेले असतात.
- नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल