परभणी (Parbhani) :- सर्वधर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या हजरत तुराबुल हक यांच्या ऊरुस यात्रेस प्रारंभ झाला आहे. यात्रेत प्रचंड गर्दी होत आहे. यात्रेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने खबरदारी म्हणून जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शिवाय पोलिस बंदोबस्तही लावण्यात आला आहे.
जागोजागी बसविले सीसीटीव्ही कॅमेरे
शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या हजरत तुराबुल हक यांच्या ऊरुस यात्रेस देशभरातील भाविक येत असतात.यावर्षी देखील ऊरुस यात्रेस प्रारंभ झाला असून यात्रेत प्रचंड गर्दी दिसून येत आहे. या गर्दीत चोरटे आपला हात साफ करत असतात. महिला, युवतींची छेड काढण्याचे प्रकार आणि भांडण तंटे होत असतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलिस अधिक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिस चौकीत सीसीटीव्हीचा नियंत्रण कक्ष बसविण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील, दिनकर डंबाळे, पोनि. ननवरे, पोनि. डोंगरे, सपोनि. कसले, सपोनि. वामन बेले, सपोनि. पुंड यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेची पूर्ण टीम बंदोबस्त करत आहे.