सरकार प्रत्येक हिंदूंच्या पाठीशी: नितेश राणेPudhari
Published on
:
06 Feb 2025, 8:53 am
Updated on
:
06 Feb 2025, 8:53 am
श्रीगोंदा: ‘हिंदूंवरील अन्याय सहन केला जाणार नाही. कोणी दहशत माजवत असेल तर ती मुळासकट मोडून काढू,’ असे सांगत सरकार प्रत्येक हिंदूंच्या पाठीशी उभे आहे, अशी ग्वाही मत्स्य व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
दिवाळीच्या दिवशी शहरात दोन गटांत झालेल्या वादानंतर एकाचा मृत्यू झाला होता. यातील मृताच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी मंत्री नितेश राणे बुधवारी (ता. 5) श्रीगोंदा येथे आले होते. आमदार संग्राम जगताप, आमदार विक्रम पाचपुते या वेळी उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना मंत्री राणे म्हणाले, की उन्माद करण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत; मात्र त्यांना धडा शिकवण्यासाठी शासन व प्रशासन खंबीर आहेत. तोच संदेश घेऊन हिंदू समाजाला धीर व ताकद देण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत.
हिंदूंवरील अन्यायाच्या घटना या सरकारच्या काळात खपवून घेतल्या जाणार नाहीत. मी सरकारच्या वतीने विश्वास देतो की सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. जिहादी विचारांचे काही लोक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्यांना धडा शिकवू.
राणे पुढे म्हणाले, की बुरखा घालून परीक्षेत कॉपी करण्याचे काही प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. पारदर्शक वातावरणात परीक्षा पार पडव्यात ही सर्वांची अपेक्षा असते. त्याअनुषंगाने मी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्यांनी पारदर्शक व कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्याचे आश्वासन दिले आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तुमची भेट घ्यायला आलो आहे. आता सगळे प्रकरण सविस्तर समजून घेतले आहे. समोरच्यांची दहशत मोडून काढू, भीतीचे वातावरण ठेवणार नाही. सरकार तुमच्यासोबत आहे, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी मृताच्या नातेवाइकांना दिला.