Published on
:
06 Feb 2025, 9:00 am
ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या घोडबंदर पट्ट्यातील पर्यावरणनीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कचरा टाकणे ठाणे महापालिकेला भोवले आहे. या प्रकरणात राष्ट्रीय हरित लवादाकडून ठाणे महापालिकेला नोटीस बजावण्यात आली आहे. ऍड. वैभव साटम यांनी यासंदर्भात हरिद लवादाकडे दाद मागितली होती. ठाणे महापालिकेकडून आता यासंदर्भात स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.
ठाण्यातील गायमुख जकात नाका, घोडबंदर रोड परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असून हे संपूर्णतः पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ तटीय नियमन क्षेत्र अधिसूचना २०११ तसेच इको-सेंसिटिव्ह झोन मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आहे. या परिसरात बेकायदेशीर कचरा टाकण्यामुळे या भागातील नैसर्गिक संपदा धोक्यात आली असून, येथील जैवविविधता, जलस्रोत आणि वन्यजीव धोक्यात आले असल्याची बाब एड. वैभव साटम यांनी राष्ट्रीय हरित लवादाच्या निदर्शनास आणून दिली.
ठाणे महानगरपालिका , महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र तटीय झोन व्यवस्थापन प्राधिकरण आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका यांना यापूर्वीच कायदेशीर नोटीस, छायाचित्रे आणि तक्रारी सादर करण्यात आल्या होत्या. तसेच , मात्र तरीही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरच वैभव साटम यांनी गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
बेकायदेशीर कचरा टाकण्याची प्रक्रिया त्वरित थांबवावी, जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी व दंडात्मक उपाययोजना कराव्यात, पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, महापालिकेने या संदर्भात झालेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करावा अशी मागणी वैभव साटम यांनी राष्ट्रीय हरित लवादाच्या नोटीसनंतर पालिका प्रशासनाकडे केल्या आहेत.
महापालिका व पर्यावरण विभाग यांचे वारंवार दुर्लक्ष आणि निष्क्रियता यामुळे समोर आली असून जर तातडीने योग्य कारवाई झाली नाही, तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर प्रक्रिया राबवावी, महापालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवावी आणि ठाणे शहरातील पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रांचे संरक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलली अशी मागणी तक्रारदारांकडून करण्यात आली आहे.