धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, तरच सरकारची इभ्रत राहील; वडेट्टीवार यांची महायुतीवर सडकून टीका

3 hours ago 1

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारमधील वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. मीडियाशी बोलताना वडेट्टीवार यांनी मुंडेंसह लाडकी बहीण योजना, शेतकरी कर्जमाफीवरून सरकारचा चांगलाच समाचार घेतला. भ्रष्टाचारामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे. त्यांना मंत्रीपदावरून लवकरात लवकर काढलं तरच सरकारची इज्जत, इभ्रत राहिल. नाहीतर आहे ते ही घालवून बसतील, असा टोला वडेट्टीवार यानी सरकारला लगावला आहे.

“सरकार हे बेशरमाचं झाड झालंय”

फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदेचं सरकार हे भ्रष्टाचाराचं सरकार आहे, असा मॅसेज जाईल. यांना थोडंतरी कळायला पाहिजे, यांच्यावर किती प्रकारचे आरोप झालेत. भ्रष्टाचाराचे आरोप, मग त्यांचे सहकारी खूनामध्ये सापडतात. तरीही हा मंत्री पदावर कायम राहतो. म्हणजे सरकार हे बेशरमाचं झाड झालंय हे म्हणायला हरकत नाही. काही झालं तरी त्याच्यावर कारवाई करायची नाही असं जर धोरण असेल तर त्याला काही इलाज नाही. बिनधास्त खा, बिनधास्त रहा, महाराष्ट्र लुटून खा, अशी काही पद्धत महाराष्ट्रात आणली असेल तर लखलाभ आहे.

महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खालावत चाललेय असं म्हटलं जातंय. यामुळे शिवभोजन थाळीसारख्या अनेक योजना बंद कराव्या अशी शंका उपस्थित झाली आहे. याबाबत वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात काल मी माझी स्पष्ट भूमिका मांडली. सहा महिन्यांपासून मनरेगाचे पैसे दिले नाहीत. चार महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळत नाहीत. अंगणवाडी सेविकांचे पैसे मिळत नाही. कंत्राटदार संप पुकारू लागलेत.

“सर्व योजनांना लुबाडून लाडकी बहीण आणली, आता खुर्च्या उबवतायत”

निवडणुकीसाठी सर्व योजनांना कात्री लावून, लुबाडून लाडकी बहीण आणली. मतं घेतली आता खुर्ची उबवतायत. लाडक्या बहिणींच्या आता मोठ्या प्रमाणावर टू व्हिलर आणतील, मग फोर व्हिलर, मग स्लॅपचं दोन खोल्यांचं घर असेल घरकुल मिळालं असेल तर ते ही काढतील. हळूहळू लाडक्या बहिणींचा आकडा तीन कोटींवरुन 25-30 लाखांपर्यंत आणतील. आता खूप निकष लावलेत. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ 1000 वरून 500 रुपयांवर आणतील. यांची डोकी भ्रष्ट झालीत, विकृत झालीत अशा पद्धतीने हे निर्णय घेतात.

छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले आहे की शिवभोजन थाळी बंद करू नका. भुजबळ साहेबांचं सध्या फडणवीस साहेब ऐकतील अशी परिस्थिती आहे. भुजबळ फडणवीसांच्या, भाजपच्या जवळ गेल्याचं दिसतंय. त्यामुळे भुजबळांचं फडणवीस ऐकतील असं दिसतंय.

कर्जमाफी होऊनही 7.38 कोटी थकबाकी शेतकऱ्यांवर आहे अशी माहिती आहे. सरकारने जाहीरनाम्यात दिलंय 3 लाखापर्यंत कर्ज माफ करू सांगितलं, लोकं कशाला भरतील. लोकांनी विचार केला कर्ज माफ होणार आहे. जाहीर सभेत छातीठोकपणे सांगितलं आम्ही 3 लाखापर्यंतच कर्ज माफ करून त्यांचं कुठं झालंय काय. या बजेटमध्येसुद्धा देऊ शकणार नाहीत, कारण पैसेच नाहीत. देणं एवढं आहे, दोन लाख कोटींचं देणं सरकारवर आहे आणि त्या लाडक्या बहिणींचा पुन्हा अतिरिक्त खर्च आहेच. मग देणार कुठून? शेतकऱ्यांचे जे हाल होत आहेत त्याला पूर्णतः सरकार जबाबदार आहे.

“देणं उसळाचं, जाहीरात कुसळाची”

लाडक्या बहिणीच्या प्रचारासाठी 3 कोटी खर्च केले. यावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार यांनी मागच्या वेळी सव्वाशे कोटी खर्च केल्याचे सांगितले. देणं उसळाचं, जाहीरात कुसळाची आहे. जाहिराती देऊन लाडक्या बहिणींना जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी दिशाभूल करण्याचा नवा फंडा आणू इच्छित आहेत.

“शेतकऱ्यांचं कर्ज माफ करताना हाताला लकवा मारला का?”

एकीकडे अनिल अंबानीचं 50 हजार कोटीचं कर्ज 500 कोटी रुपयांमध्ये सेटलमेंट केलं. आतापर्यंत कॉर्पोरेट सेक्टरमधील 29 लाख कोटींचं कर्ज माफ झालं. मग शेतकऱ्यांचं कर्ज माफ करताना यांच्या हाताला लकवा मारला का? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. उद्योगपती आणि व्यापाऱ्यांचे एवढं कर्ज माफ करता आणि शेतकऱ्याप्रती ही अनास्था असेल. तर मैदान आहे पुढे, संपलं नाही. लोकसभा झाली, विधानसभा झाली, जिल्हा परिषदेमध्ये ईव्हीएममध्ये गडबड नाही झाली तर लोकांचा आक्रोश नक्की दिसेल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article