विविध एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला हॅट्ट्रिक साधता येणार नाही. (File Photo)
Published on
:
06 Feb 2025, 6:14 am
Updated on
:
06 Feb 2025, 6:14 am
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान झाल्यानंतर सायंकाळी लगेच विविध संस्थांनी एक्झिट पोल जारी केले. विविध एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला हॅट्ट्रिक साधता येणार नाही. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढलेल्या भाजपला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मागच्या दशकभरापासून दिल्लीत भोपळा न फोडता आलेल्या काँग्रेससाठी सुखद म्हणजे पक्षाचे खाते उघडण्याची शक्यता आहे.
राजधानीतील ७० विधानसभेच्या जागांपैकी ३६ जागा बहुमतासाठी गरजेच्या आहेत. १० एक्झिट पोलपैकी ८ मध्ये भाजपला बहुमत मिळत असल्याचा अंदाज आहे. केवळ २ मध्येच आम आदमी पक्षाला (आप) बहुमताची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोल ऑफ पोल्समध्ये भाजपला ३९, 'आप'ला ३० आणि काँग्रेसला १ जागा मिळण्याचा अंदाज आहे. जेव्हीसी आणि पोल डायरीने त्यांच्या एक्झिट पोलमध्ये इतरांनाही प्रत्येकी १ जागा मिळू शकते असा अंदाज वर्तवला आहे.
राजधानी दिल्लीमध्ये अडीच दशकांपासून भाजप सत्तेपासून दूर आहे. भाजपचा सत्तेचा हा दुष्काळ या निवडणुकीत दूर होईल, अशी शक्यता एक्झिट पोलच्या अंदाजांमध्ये वर्तवण्यात आली आहे. तर मागच्या दशकभरापासून एकही आमदार नसलेल्या काँग्रेस पक्षालाही दिल्लीत खाते उघडता येईल, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.
विविध संस्थांच्या एक्झिट पोलचे अंदाज
मैट्रिज
आप- ३२ ते ३७, भाजप- ३५ ते ४०, काँग्रेस- ० ते १
पीपल्स इनसाइट
आप- २५ ते २९, भाजप- ४० ते ४४, काँग्रेस- ० ते १
पीपल्स पल्स
आप- १० ते १९, भाजप- ५१ ते ६०, काँग्रेस- ००
जेवीसी पोल्स
आप- २२ ते ३१, भाजप- ३९ ते ४५, काँग्रेस- ० ते २
रिपब्लिक भारत
आप- ३२ ते ३७, भाजप- ३५ ते ४०, काँग्रेस- ० ते १
पी-मार्क्यू
आप- २१ ते ३१, भाजप- ३९ ते ४९, काँग्रेस- ० ते १
चाणक्य स्ट्रॅटर्जी
आप- २५ ते २८, भाजप- ३९ ते ४४, काँग्रेस- २ ते ३
पोल डायरी
आप- १८ ते २५, भाजप- ४२ ते ५०, काँग्रेस- ० ते २
डीवी रिसर्च
आप- २६ ते ३४, भाजप- ३६ ते ४४, काँग्रेस-००
वीप्रीसाइड
आप- ४६ ते ५२, भाजप- १८ ते २३, काँग्रेस- ० ते १
२०२० मध्ये १२ पैकी केवळ १ एक्झिट पोल अंदाज बरोबर ठरला
दिल्ली विधानसभेच्या २०२० च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला ६२ जागांवर विजय मिळाला होता. भाजपला ८ जागा जिंकता आल्या होत्या. तर काँग्रेसला खाते उघडता आले नव्हते. त्यावेळी १२ संस्थांच्या एक्झिट पोलपैकी केवळ एका संस्थेचा अंदाज खरा ठरला होता.