Published on
:
06 Feb 2025, 4:17 am
Updated on
:
06 Feb 2025, 4:17 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राच्या मातीतील एका प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित 'झी स्टुडिओज्', 'चॉक अँड चीज फिल्म्स' आणि 'फिल्म जॅझ' निर्मित 'आता थांबायचं नाय!' हा महत्त्वाकांक्षी चित्रपट १ मे पासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. वेगवान रस्त्यावरील एका भिंतीवर तीन ठसठशीत रंगांत लिहिलेले 'आता थांबायचं नाय!' हे शीर्षक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच स्फूर्ती देते. या प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमधून ऐकू येणारे जादुई संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करत कमालीचे आकर्षण तयार करीत आहे.
'झी स्टुडीओज्', 'चॉक अँड चीज फिल्म्स' आणि 'फिल्म जॅझ' निर्मित 'आता थांबायचं नाय!' या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकप्रिय अभिनेते शिवराज वायचळ यांनी केले आहे. प्रेरणादायी सत्यकथेवर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रमुख भूमिकांमध्ये लोकप्रिय अभिनेते भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, श्रीकांत यादव, पर्ण पेठे, प्रवीणकुमार डाळिंबकर, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे तसेच एका खास भूमिकेत रोहिणी हट्टंगडी आणि एका कर्तबगार, संवेदनशील अधिकाऱ्याच्या भूमिकेत आशुतोष गोवारीकर यांना आपण पाहणार आहोत.
'आता थांबायचं नाय!' या चित्रपटाचे लेखन शिवराज वायचळ, ओमकार गोखले आणि अरविंद जगताप यांनी केले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्माते उमेश के बन्सल (झी स्टुडिओज्), निधी परमार - हिरानंदानी (चॉक अँड चीज फिल्म्स'), क्रिएटिव्ह प्रोड्युसर - तुषार हिरानंदानी, धरम वालीया (फिल्म जॅझ) हे सर्व एकत्र आले आहेत.