आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला अवघ्या काही दिवसांचा अवधी बाकी आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे एकूण 8 संघ त्यांच्या पद्धतीने सराव करत आहेत. या स्पर्धेतून काही खेळाडूंना दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलंय. खेळाडूंची इच्छा असूनही फक्त दुखापतीमुळे या खेळाडूंना मनाविरुद्ध बाहेर बसावं लागणार आहे. तर काही असेही खेळाडू आहेत, ज्यांना या स्पर्धेत खेळायची इच्छा होती मात्र त्यांना संधी मिळाली नाही. मात्र एका खेळाडूने कहरच केलाय, असंच म्हणावं लागेल. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी संघात निवड होऊनही या खेळाडूने तडकाफडकी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संघाला मोठा झटका लागला आहे.
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी ऑलराउंडर मार्कस स्टोयनिस याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचं जाहीर केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा टी 20i कर्णधार मिचेल मार्श हा आधीच दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यात एकदिवसीय संघाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड हे दोघेही या स्पर्धेतून बाहेर पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यात मार्कस स्टोयनिसने निवृत्ती जाहीर करत ऑस्ट्रेलियाचं टेन्शन आणखी वाढवलं आहे.
ऑस्ट्रेलियाचं चॅम्पियन्स ट्रॉफीतील वेळापत्रक
22 फेब्रुवारी, विरुद्ध इंग्लंड, लाहोर
25 फेब्रुवारी, विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी
28 फेब्रुवारी, विरुद्ध अफगाणिस्तान, लाहोर