Nellore cow | भारतीय जातीच्या गायीची ४० कोटी विक्री; जगभरात का आहे मागणी ?file photo
Published on
:
06 Feb 2025, 9:26 am
Updated on
:
06 Feb 2025, 9:26 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : पशुपालनाच्या जगात एक अभूतपूर्व घटना घडली आहे. ब्राझीलमध्ये झालेल्या पशु मेळ्यात भारतीय नेल्लोर (Nellore) जातीच्या 'व्हिएटिना-१९' (Viatina-19) नावाची गाय ४० कोटी रुपयांना विकली गेली. आतापर्यंत विकली जाणारी ती सर्वात महागडी गाय ठरली असून तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
ब्राझीलमधील मिनास गेराईस येथे गाईचा लिलाव झाला. यात नेल्लोर जातीच्या 'व्हिएटिना-१९' (Viatina-19) नावाच्या गायीची बोली तब्बल ४० कोटी रुपयांना लागली. तिचे १ हजार १०१ किलो वजन आहे. या जातीच्या इतर गायींच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट वजन आहे. ४.८ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ४० कोटी रुपये) मध्ये ही गाय विकण्यात आली. ती आतापर्यंत विकली जाणारी सर्वात महागडी गाय ठरली आहे. (Nellore cow)
भारतात कोठे आढळते नेल्लोर गाय
नेल्लोर जातीच्या गायींना भारतात ओंगोल जातीच्या नावाने ओळखले जाते. मूळतः आंध्र प्रदेशच्या ओंगोल प्रदेशातून आलेली ही जात कठीण हवामान सहन करण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. ही जात भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगणा येथे आढळते. (Nellore cow)
'Viatina-19' ही साधी गाय नसून तिच्या अद्वितीय आनुवंशिक गुणधर्मांमुळे आणि शारीरिक वैशिष्ट्यांमुळे ती जगभर ओळखली जाते. तिने प्रतिष्ठित 'चॅम्पियन्स ऑफ द वर्ल्ड' स्पर्धेत 'मिस साउथ अमेरिका' हा बहुमान पटकावला आहे. तिची विलक्षण स्नायूंची रचना आणि दुर्मिळ आनुवंशिक वारसा यामुळे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यामुळेच तिची वासरू (embryos) जगभर निर्यात केली जातात. (Nellore cow)
या गायींची वैशिष्ट्ये काय?
अधिक उष्णता सहन करू शकते
रोगप्रतिकारक शक्ती जास्त
उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये राहण्याची क्षमता
पांढरा शुभ्र रंग आणि शारीरिक वैशिष्ट्यांमुळे उठून दिसते
उच्च पुनरुत्पादन क्षमता