पुणे: अमेरिका आणि चीन या आर्थिक महासत्तांमध्ये व्यापारयुद्ध सुरू झाल्याने गुंतवणूकदारांनी सोने खरेदीचा सपाटा सुरू केला आहे. परिणामी, गेल्या चोवीस तासांत 10 ग्रॅम 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 87 हजार रुपयांवर गेला आहे. तर, चांदीचा प्रतिकिलो भाव पुण्यात 96 हजार रुपये असून, देशात विविध ठिकाणी चांदीचा दर 99,500 रुपयांवर गेला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर शुल्कवाढ लागू करण्याचा निर्णय जाहीर केला, नंतर चीनवर प्रत्यक्ष करवाढ लागू केली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात कमालीची अनिश्चितता निर्माण झाली आहे. परिणामी, गुंतवणूकदारांनी सुरक्षिततेसाठी सोन्यात पैसे ओतण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, गेल्या दोन दिवसांत शुद्ध सोन्याच्या भावात प्रतितोळा तीन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तर, चोवीस तासांत सोने 1,800 रुपयांनी महागले आहे.