आयुष्य अतिशय क्षणभंगूर आहे, कोणाचा मृत्यू कधी, कसा, केव्हा होईल सांगता येत नाही. जळगावच्या अमळनेरमध्ये अशीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे. तेथे नदीकाठी बसून अकराव्याची पूजा करत असताना पुजाऱ्याने होम पेटवला,मात्र तोच होम त्याच्यासाठी जीवघेणा ठरला. त्यानंतर जे घडलं त्यामुळे त्या पुजाऱ्याचा जीवच गेला. यामुळे प्रचंड खळबळ माजली असून अमळनेरमधील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
अकराव्याची पूजा करत असताना हो पेटवला, त्यातून आलेल्या धुरामुळे आक्रीत घडलं आणि पुजाऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेची दखल पोलीसांनी घेतली असून पुढील कार्यवाही केली जात आहे.
नेमकं काय झालं ?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमोल शुक्ल असे मृत पुजाऱ्याचे नाव असून ते 38 वर्षांचे होते. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी अमोल शुक्ल हे जळोद येथे अकराव्याच्या पूजेसाठी गेले होते. तेव्हा त्यांनी तेथे होम पेटवला. मात्र त्या होमामधून धूर निघू लागला आणि नदीकाठी एक पूल होता, तिथपर्यंत तो धूर पोहोचला. त्याच पुलाच्या खाली मधमाशांचे मोहोळ उठलं आणि त्या मधमाशांनी आजूबाजूच्या लोकांवर हल्ला चढवला.
यावेळी सर्वात जास्त मधमाशा अमोल शुक्ल या पुजाऱ्याच्या तोंडाला चावल्या. ते गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्ल यांना आधीच मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. त्यातच मधमाशांनी चावा घेतल्याने शुक्ल यांना अधिक त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी अमळनेर येथे आणलं जात होतं. मात्र वाटेतच त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, आणि रस्त्यातच श्वास बंद पडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत इतर पाच ते सहा जणांना देखील मधमाशा चावल्याने ते जखमी झाले होते, त्यांनाही अमळगाव ग्रामीण रुग्णालयात आणून उपचार करण्यात आले.