Published on
:
06 Feb 2025, 1:41 am
Updated on
:
06 Feb 2025, 1:41 am
सांगली/विटा : विटाजवळील कार्वे (ता. खानापूर) येथील औद्योगिक वसाहतीमधील रामकृष्ण माऊली इंडस्ट्रीज हा बंद कारखाना कोणत्याही परवानगीविना एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी भाड्याने दिल्याबद्दल गोकुळा विठ्ठल पाटील (वय 47, रा. पाटीलवस्ती, विटा) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मंगळवारी अटक केली. पाटील यांना बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता, पाच दिवसांची कोठडी सुनावली.
याबाबत माहिती अशी की, कार्वे औद्योगिक वसाहतीत माऊली इंडस्ट्रिज या कारखान्यात एमडी ड्रग्ज तयार केले जात असल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. पथकाने छापा टाकून 29 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, हा कारखाना संशयितांनी अत्तर तयार करण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतल्याचे सांगितले होते. पण, आता कारखान्याच्या मालक गोकुळा पाटील यांनाच पोलिसांनी अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
पाटील यांनी 2020 मध्ये जावळे नामक व्यक्तीकडून हा कारखाना औद्योगिक विकास महामंडळाच्या परवानगीने हस्तांतरित करून घेतला होता. या कारखान्यात आधी तार, खिळेमोळे तयार केले जात होते. तशी परवानगीही एमआयडीसीकडून घेण्यात आली होती. दोन वर्षांपासून कारखाना बंद होता. महामंडळाने त्यांना दीड वर्षापूर्वी नोटीस बजावली होती. एमडी ड्रग्ज प्रकरणातील संशयित राहुदीप बोरिचा, बलराज कातारी यांनी गोकुळा पाटील यांच्याकडे अत्तर तयार करण्यासाठी शेड मागितले होते. पण संशयितांकडे व्यवसायाचा परवाना नव्हता. पाटील यांना परवानगीची खातरजमा न करता कारखाना भाडेतत्त्वावर दिला. त्यासाठी केलेला भाडेकरारही अधिकृत नाही. एमआयडीसीलाही भाडेतत्त्वावर कारखाना दिल्याची माहिती दिलेली नाही. कारखान्यात केमिकल्सचा वापर आणि परफ्युमच्या उत्पादनाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती दिली नाही. त्यांची कोणतीही परवानगी नव्हती.
गोकुळा पाटील यांनी कोणतीही खातरजमा न करता शेड भाड्याने दिल्यामुळे त्याठिकाणी संशयितांनी एमडी ड्रग्जचे उत्पादन सुरू केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. प्राथमिक तपासात गोकुळा पाटील यांना बेकायदेशीर बाबींबद्दल मंगळवारी अप्पर अधीक्षक रितू खोखर यांनी विटा येथे ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची चौकशी करून रात्री उशिरा अटकेची कारवाई करण्यात आली. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसाची कोठडी सुनावली.
गोकुळा पाटील यांनी पाचशे रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर करार केला होता. करारपत्रावर साक्षीदारांच्या सह्या नाहीत. तसेच कराराची नोंदणी केलेली नाही. करारपत्रावरील तारखांमध्येही फेरफार आहे. ही माहिती पोलिस तपासात समोर आल्याने त्यांना अटक केल्याचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले.