बुर्शीमुळे काटोल व नरखेड तालुक्यात संत्रा व मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही तालुक्यांसाठी 48 कोटी 31 लाख रुपये मंजूर करण्यात आले. तसा शासन आदेश निघाला; परंतु अद्यापही ती रक्कम शेतकऱयांच्या खात्यात टाकण्यात आली नाही. संत्रा, मोसंबी उत्पादकांना ही मदत तातडीने देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
काटोल व नरखेड तालुक्यात सात महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे संत्रा व मोसंबीवर बुर्शी रोग गेला होता. यामुळे मोठय़ा प्रमाणात फळगळ झाली होती. यासंदर्भात राष्ट्रवादी कॉँग्रेसने सलील देशमुख यांच्या नेतृत्वात नागपुरात मोठे आंदोलन केले. यानंतर सर्व्हे करून अहवाल शासनाला सादर करण्यात आला होता. यासंदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित करून तातडीने निधी मंजूर करावा अशी मागणी मी केली होती. यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी काटोल तालुक्यासाठी 19 कोटी 43 लाख रुपये, तर नरखेड तालुक्यासाठी 28 कोटी 88 लाख असे एकूण 48 कोटी 31 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.