महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेने आयोजित केलेल्या ‘मि. सीटीआर क्लासिक’ शरीरसौष्ठव स्पर्धेत नौदलाच्या पी. टी. अनबनने आपल्याच संघाच्या स्वप्नील नरवडकर आणि पुण्याच्या कमलेश अच्छरावर मात करत बाजी मारली.
राज्यभरातील दमदार आणि पीळदार देहयष्टीच्या शेकडो खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत क्रीडाप्रेमींना अत्यंत चुरशीचा पीळदार थरार पाहायला मिळाला. एकंदर सात गटांत रंगलेल्या या स्पर्धेत जेतेपदासाठी अनबन, कमलेश, स्वप्नील यांच्यात कांटे की टक्कर झाली. ज्यात आपल्या भीमकाय देहयष्टीच्या जोरावर अनबनने ‘मि. सीटीआर क्लासिक’चे जेतेपद आपल्याकडे खेचले. शरीरसौष्ठव स्पर्धेबरोबर पुरुषांच्या फिजीक गटाचेही आयोजन करण्यात आले होते. यातही मोठय़ा संख्येने खेळाडूंनी सहभाग घेतला. या गटात नागपूरच्या नीलेश जोशीने बाजी मारली. या भव्यदिव्य स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा हिंदुस्थानी शरीरसौष्ठव महासंघाचे सर्वेसर्वा संजय मोरे, महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस नंदू खानविलकर आणि आयोजक सय्यद झैद यांच्या उपस्थितीत पार पडला.
‘मि.सीटीआर क्लासिक’चा निकाल
55 किलो वजनी गट ः 1. राजेश तारवे (मुंबई), 2. सोमनाथ पाल (पुणे), 3. नीलेश गजमल (पुणे); 60 किलो ः 1. बाळू काटे (पुणे), 2. गीतेश मोरे (मुंबई), 3. लोचन जनबंद (मुंबई); 65 किलो ः 1. नरेंद्र काल्हेकर (पुणे), 2. संदीप साबळे (मुंबई), 3. रोशन घाटे (पुणे); 70 किलो ः 1. स्वप्नील नरवडकर (नौदल), 2. नदीम शेख (उपनगर), 3. जुलाह रऊफ शफी (बीड) ; 75 किलो ः 1. उमेश गुप्ता (उपनगर), 2. भगवान बोराडे (उपनगर), 3. फारुख शेख (अकोला) ; 80 किलो ः 1. कमलेश अच्छरा (पुणे), 2. अमीर पठाण (छत्रपती संभाजीनगर), 3. ऋषिकेश बिरादर (पुणे); 80 किलोवरील ः 1. पी. टी. अनबन (नौदल), 2. विशाल सुरवसे (पुणे), 3. अक्षय शिंदे (पुणे).