Published on
:
06 Feb 2025, 12:57 am
Updated on
:
06 Feb 2025, 12:57 am
मूळव्याध प्रामुख्याने दोन प्रकारांमध्ये विभागला जातो. एका प्रकारात, मूळव्याध गुदद्वाराच्या आत विकसित होते. सुरुवातीला याचा कोणताही त्रास होत नाही; परंतु पुढील टप्प्यात रक्तस्राव किंवा वेदना जाणवू शकतात. दुसरा प्रकार म्हणजे, बाह्यरुपातील मूळव्याध. यामध्ये गुदद्वाराच्या बाहेर त्वचेखाली वेदनादायक गाठी जाणवतात. वारंवार कठीण मल होणे, शौचास होताना जास्त दाब द्यावा लागणे, असा त्रास होत असल्यास सतर्क होणे गरजेचे ठरते.
जड अन्नाचे नियमित सेवन, आहारातील फायबर युक्त पदार्थांची कमतरता, कमी प्रमाणात पाणी पिणे, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, ताणतणाव यामुळे मूळव्याधीची समस्या उद्भवते. सतत बसून राहिल्यास रक्ताभिसरण बिघडून मूळव्याध वाढू शकतो. गर्भाशयाच्या वाढत्या दाबामुळे काही महिलांना मूळव्याध होऊ शकतो. अतिमसालेदार व जंक फूड हे पचनसंस्थेवर परिणाम करतात आणि मूळव्याधीची शक्यता बळावते. गुदद्वाराच्या भागात वेदना होऊ लागल्यास, मलातून रक्तस्राव झाल्यास, या भागात जळजळ आणि खाज येत असल्यास, गुदद्वाराजवळ गाठी किंवा फुगलेल्या शिरा जाणवत असल्यास वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे ठरते.
मूळव्याध, रक्तस्राव व गुदद्वाराशी संबंधित आजारांवर अनेक उपाय उपलब्ध आहेत; परंतु यामध्ये आयुर्वेदिक उपचार अधिक सुरक्षित आणि प्रभावी मानले जातात. या उपचारांमध्ये बद्धकोष्ठता आणि गॅसेसच्या समस्येवर नियंत्रण ठेवले जात असल्यामुळे पचनक्रिया सुरळित होण्यास मदत होते. याखेरीज यकृताच्या कार्यक्षमतेला चालना देऊन रक्ताभिसरण सुरळीत केले जाते. आयुर्वेदिक उपचारांमुळे गुदद्वार आणि मलाशयातील सूज व ताण कमी होतो. मुख्य म्हणजे यामुळे रक्तस्राव थांबवून वेदना कमी होतात. यामुळे रुग्णांना दिलासा मिळतो.
आयुर्वेदिक उपचार संसर्गाची प्रक्रिया थांबवून जखमा भरून येण्यास मदत करतात. बदलत्या काळात कॅप्सूल रूपातही अशा प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. अर्शासवसारखे मूळव्याधीवर प्रभावी ठरणार्या वनौषधींनी बनलेले औषध या आजारावर चांगला आराम देणारे ठरते. यामध्ये हरितकी अर्क, दारुहळद, तुरटी, गोदंती भस्म, मोचरस, कडूनिंबाच्या बिया यांचा समावेश केलेला असतो. तज्ज्ञांच्या सल्ल्याने या औषधाचे सेवन केल्यास मूळव्याध, रक्तीमूळव्याधीच्या समस्येचा कायमचा निपटारा होऊ शकतो.
* हिरव्या पालेभाज्या, फळे आणि संपूर्ण धान्ये सेवन करा. * दिवसभरात किमान 8-10 ग्लास पाणी प्यावे. * चालणे, योगासने आणि हलका व्यायाम करा.
* बद्धकोष्ठता टाळण्यासाठी नैसर्गिक रेचक पदार्थ जसे की, मनुका, आळशीचे बी किंवा तुपातली भाकरी खा. * सतत बसून राहिल्याने गुदद्वारावर ताण येतो. त्यामुळे अधूनमधून उठून चालावे.
* मूळव्याध ही लाज वाटण्यासारखी गोष्ट नसून, ती एक सामान्य समस्या आहे. योग्य आहार, जीवनशैलीतील सुधारणा आणि आयुर्वेदिक उपचार घेतल्यास हा त्रास टाळता येऊ शकतो.