Kolhapur News | शिरढोण, टाकवडे परिसरात मोटर, वायरच्या चोरीने शेतकरी हतबलfile photo
Published on
:
06 Feb 2025, 4:08 am
Updated on
:
06 Feb 2025, 4:08 am
शिरढोण : शिरढोण, टाकवडे (ता. शिरोळ) येथील पंचगंगा नदीकाठावर असलेल्या पाण्याच्या मोटर आणि वायरच्या चोरीच्या घटनांनी परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे. वारंवार अशा चोरीच्या घटना घडत आहेत. अज्ञात व्यक्ती मोटर व वायर चोरून नेत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. कुरुंदवाड आणि शिरोळ पोलिसांनी तात्काळ लक्ष घालून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
चोरट्यांनी कृषीपंप व नदीकाठावरील मोटार, केबलवर डोळा ठेवला आहे. रात्री चोरीच्या घटना घडत असल्याने चोरट्यांचा सुगावा लागणे कठीण झाले आहे. शिरढोण, टाकवडे आदींसह शिरोळ तालुक्यातील गावात अशा अनेक ठिकाणी दोन महिन्यांत चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शिरढोण येथील शीतल बापूसो पाटील, प्रकाश आंबी, सुभाष भूपाल आडगाने, जीनेंद्र भूपाल आडगाने, पोपट मिणचे, कल्लाप्पा आप्पू आडगाने यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या वायरची चोरी झाली आहे.
दोन वर्षांपासून मोटर चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरीच्या दोन दोन वेळा घटना घडल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. मोटर व वायरची किंमत लाखाच्या घरात असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. पोलिसांचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून काही शेतकरी चोरीच्या घटनांची माहितीही देत नाहीत. वास्तविक तालुक्यात मोटर, वायर चोरीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यात शिरढोण येथील सहा शेतकऱ्यांच्या वायर चोरून नेल्या. तालुक्यात अनेक ठिकाणी हा प्रकार घडत आहे. पोलिसांनी रात्री गस्त घालण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
या परिसरात वारंवार अशा घटना घडत आहेत.रात्रीच्या वेळी चोरीचे प्रकार घडत आहेत.अनेक संकटांना तोंड देऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून पोलिसांनी वाचवावे.गस्त वाढवून केबल चोरांवर आळा घालावा.
- शीतल बापूसो आडगाने, शेतकरी शिरढोण