इन्कम टॅक्स विभागाने काल संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर छापे टाकले. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सातारा, मुंबई आणि पुण्याच्या घरावर ही छापेमारीची कारवाई करण्यात आली. संजीवराजे नाईक निंबाळकर हे सातारा फलटणमधील वजनदार नेते आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत. संजीवराजे नाईक निंबाळकर हे सध्या शरद पवार यांच्या पक्षात आहेत.
लवकरच ते पुन्हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच बोललं जातय. त्याआधी ही छापेमारीची कारवाई झाली. संजीवराजे नाईक निंबाळकर आधी अजित पवार यांच्यासोबतच होते. पण विधानसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता. आता ते पुन्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाच्या मार्गावर आहेत.
कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन
सातारा फलटण येथे काल आयकर विभागाकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची तब्बल 17 तास चौकशी करण्यात आली. रात्री उशिरा बारा वाजण्याच्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी बंगल्यातून बाहेर पडले. चौकशीनंतर संजीवराजे यांनी घराबाहेर येऊन कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. संजीवराजे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देण्याचं टाळलं. संजीवराजे यांच्या निवासस्थानी अजूनही पोलिसांचा बंदोबस्त आहे. काल सकाळी 6 वाजल्यापासून इन्कम टॅक्स विभागाकडून ही छापेमारीची कारवाई सुरु होती.
‘या राजघराण्याला 900 वर्षांचा इतिहास’
संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी आयकर विभागाकडून कारवाई सुरु असताना बाहेर त्यांचे कार्यकर्ते जमले होते. या कारवाई विरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनात संतापाची भावना दिसून आली. “ज्या राजघराण्यावर ही कारवाई सुरु आहे, त्या राजघराण्याला 900 वर्षांचा इतिहास आहे. भारताच्या जडणघडणीसाठी 1000 एकर जमीन आणि कित्येक किलो सोनं या घराण्याने दिलं. हा इतिहास आहे. देशाला स्वातंत्र्याकाळात मदत केली. अशा राजघराण्यावर राजकीय आकसापोटी कारवाई होत असेल, तर आम्ही कार्यकर्ते म्हणून निषेध करतो” असं एका कार्यकर्त्याने सांगितलं.