स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण केल्याप्रकरणी सोलापुरात 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आणि अभिनेता वीर पहाडियावर केलेल्या विनोदामुळे प्रणितला 2 फेब्रुवारी रोजी सोलापुरात मारहाण झाली होती. या घटनेनंतर पोलीस दखल घेत नसल्याची तक्रार प्रणितने सोशल मीडियाद्वारे केली होती. अखेर लक्ष्मण मोहन झेंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या बारा जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं होतं?
प्रणितच्या टीमने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित संपूर्ण घडलेली घटना सांगितली होती. ‘सोलापुरातील 24 के क्राफ्ट ब्र्युज याठिकाणी 2 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5.45 वाजता प्रणितचा स्टँडअप संपला. त्यानंतर तो चाहत्यांसोबत सेल्फी काढण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी उभा राहिला. चाहत्यांची गर्दी कमी झाल्यानंतर 11 ते 12 जण चाहत्यांच्या वेशात प्रणितजवळ आले. त्यांनी प्रणितला मारहाण करत धमकी दिली. प्रणितला त्यांनी लाथा-बुक्क्यांनी मारलं. हल्ला करणाऱ्यांपैकी तनवीर शेख हा म्होरक्या होत्या. बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या वीर पहाडियाबद्दल विनोद केल्याने मारहाण केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यापैकी एकाने प्रणितला धमकी दिली की, यापुढे वीर पहाडिया बाबावर विनोद करून दाखव.. म्हणजेच यापुढे विनोद केल्यास याहून गंभीर परिणामांना सामोरं जावं लागणार असल्याची धमकी त्याने दिली’, अशी माहिती प्रणितच्या टीमने दिली.
हे सुद्धा वाचा
याविषयी त्यांनी पुढे लिहिलं, ‘याहून धक्कादायक बाब म्हणजे ज्याठिकाणी कार्यक्रम झाला, तिथे कोणतीच सुरक्षाव्यवस्था नव्हती. अनेकदा विनंत्या करूनसुद्धा ते सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार देत आहेत. आम्ही पोलिसांचीही मदत मागितली. मात्र त्यांनीसुद्धा कोणतीच मदत केली नाही.’
वीर पहाडियाचं स्पष्टीकरण
अक्षय कुमारच्या ‘स्कायफोर्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या वीर पहाडियाने या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. “प्रणित मोरेसोबत जे घडलं, त्याबाबत ऐकून मला खूपच धक्का बसला आहे. मी हे स्पष्ट करू इच्छितो की यात माझा कोणताही सहभाग नाही आणि कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा मी निषेध करतो. मी स्वत: नेहमीच ट्रोलिंगकडे गांभीर्याने पाहत नाही, त्यावर हसतो आणि माझ्या विरोधकांशाही प्रेमाने वागतो. त्यामुळे मी कधीच अशा पद्धतीच्या घटनांना प्रोत्साहन देणार नाही. प्रणित आणि त्याच्या संपूर्ण चाहत्यांची मी माफी मागतो. असं कोणासोबतच घडू नये. यासाठी जो कोणी जबाबदार असेल त्याला शिक्षा होण्यासाठी मी स्वत: लक्ष घालेन”, असं आश्वासन वीरने दिलंय.