Published on
:
06 Feb 2025, 12:50 am
Updated on
:
06 Feb 2025, 12:50 am
रत्नागिरी : महाराष्ट्रात वीज पुरवठा करणार्या महावितरण कंपनीकडून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित टी.ओ.डी. (टाईम ऑफ डे) स्मार्ट वीज मीटर वीज ग्राहकांच्या घरात लावले जात असून, टीओडी मीटर हे ग्राहकांना मोफत मिळणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 12 हजार 885 टी.ओ.डी. वीजमीटर बसवण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. हे मीटर लावल्यानंतर प्रीपेड चार्जिंग सुविधा लागणार नसून, वीज दरात सवलत मिळणार आहे. सध्या सुरू असलेल्या प्रणालीत कोणताही बदल होणार नसल्याचाही महावितरणने स्पष्ट केले.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात कोकण वीज परिमंडळात ट्रान्सफॉर्मर आणि विज केंद्रात उच्चदाब वीज वाहिन्यांसोबत जुळलेल्या ठिकाणात या नव्या तंत्रज्ञानाचे डीजिटल मीटर लावण्याचे काम सध्या सुरू आहे. जिल्ह्यात महावितरणचे 6 लाखाहून अधिक वीज ग्राहक आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 330 पैकी 259 ठिकाणी उपकेंद्रातील फिडरवर टीओडी वीजमीटर बसविण्यात आले आहेत. ट्रान्सफॉर्मर 8856 पैकी 1651 ठिकाणी, शासकीय कार्यालये असलेल्या 12,248 पैकी 4205 ठिकाणी, नादुरूस्त असलेले 4,388 ठिकाणी टीओडी वीजमीटर लावण्यात आले आहेत. तसेच नवीन कनेक्शन घेतलेल्या 1 हजार 316 ग्राहकांना हे वीजमीटर देण्यात आले आहेत. महावितरणच्या या योजनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व नवे आणि जुन्या ग्राहकांना हे मीटर मोफत मिळणार आहेत. यासाठी कोणताही शुल्क महावितरण कंपनीला अदा करावे लागणार नाही.
एप्रिल 2025 महिन्यापासून घरगुती वीज ग्राहकांना टाइम ऑफ डे वीज मीटर प्रमाणे लागू होणार आहे. या संदर्भात महावितरण कंपनीने नुकतेच विद्युत नियामक आयोगाकडे वीजदर निश्चिती संदर्भात प्रस्ताव सादर केला, आहे. यात घरगुती ग्राहकांना प्रत्येक दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेदरम्यान वीज वापरल्यास सवलत देण्याचा मुख्य प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, या सवलतीचा लाभ घेण्यासाठी सर्व वीज ग्राहकांना आपल्या घरात टीओडी वीज मीटर लावणे आवश्यक असेल, असे महावितरण कंपनीकडून माहिती देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या सुधारित वीज वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत अर्थातच आयडीएसएस महावितरण कडून आधुनिक वीज मीटर इन्फ्रास्ट्रक्चरसाठी देशात सेवा पुरवठादारांची सेवा घेतल्या जात आहे. यात एनसीसी, मॉन्टे कार्लो, जेनस, अदानी या कंपन्यांची सेवा पुरवठयासाठी निविदा प्रक्रियेतून निवड झालेली असल्याची माहितीही महावितरणकडून देण्यात आली.
कोणतीही प्रीपेडची सक्ती नसलेले तंत्रज्ञान...
सध्या नवीन वीज जोडणी आणि सदोष व नादुरुस्त ठिकाणी हे नवे मीटर लावण्यात येत आहे. या सर्व फायद्यांमुळे वीज ग्राहकांनी गैरसमज न ठेवता आणि कोणतीही प्रीपेडची सक्ती नसलेल्या नव्या तंत्रज्ञान वर आधारित टीओडी मीटर आपल्या घरात बसविण्यासाठी महावितरणला सहकार्य करावा, असे आवाहन या कंपनीने केले आहे.