Published on
:
06 Feb 2025, 12:50 am
Updated on
:
06 Feb 2025, 12:50 am
कुठल्याही क्षेत्रात शंभर टक्के यशस्वी होण्यासाठी निश्चित अशी तत्त्वे जगाच्या पाठीवर अस्तित्वात असल्याचे उदाहरण नाही. त्यामुळे एखाद्याने मिळवलेल्या यशामागे सभोवतालची परिस्थिती, आर्थिक स्थिती, बुद्धिमत्ता आणि कुवत हे घटक असतात, हे लक्षात घेतले पाहिजे. जगातील बहुसंख्य यशस्वी व्यक्तींनी त्या यशस्वी कशा झाल्या याचे स्वानुभव सांगितले आहेत. त्यांचेच अनुकरण विविध क्षेत्रात यश मिळविण्यासाठी धडपडणारे कित्येक जण करीत असतात. यापैकी काही यशस्वी होतातही; परंतु प्रत्येकाला त्यांच्या स्वानुभवाचे सूत्र लागू होते, असे नाही.
1923 साली अमेरिकेच्या शिकागो येथील प्रसिद्ध ‘एजवॉटर बीच’ हॉटेलात जगातील सर्वात जास्त यशस्वी अशा 9 सर्वश्रेष्ठ व्यक्तींची परिषद भरली होती. त्याकाळात अमेरिकन सरकारच्या तिजोरीत असलेल्या रकमेपेक्षाही जास्त रक्कम या 9 जणांकडे होती. त्या सर्वांना ‘यशाची तत्त्वे’ आपल्या उद्योग, व्यवसायात कशी वापरायची याचे सर्वज्ञान होते. मात्र, यानंतर 25 वर्षांनी म्हणजेच 1948 साली या नऊपैकी तिघेजण दिवाळखोरीत गेल्याने उद्ध्वस्त झाले होते. दुसरे तिघेजण भिकेला लागले होते आणि उर्वरित तिघांनी आत्महत्या केली होती. निर्भेळ यशाची तत्त्वे कोणती, हे सांगणारी ही जगातील सर्वाधिक यशस्वी 9 माणसे होती. यश म्हणजे काय याचा त्यांनी केवळ अनुभवच घेतला नव्हता तर यशाच्या नशेच्या कैफाची धुंदीही त्यांनी अनुभवली होती आणि तरीही पाव शतकाच्या काळात त्यांच्या वाट्याला दारुण दु:ख आणि क्रूर वंचनेशिवाय काहीच आलं नाही. त्यामुळे प्रत्यक्षात यश म्हणजे काय? हा मोठा गहन प्रश्न अनुत्तरित राहतो.
विद्युत बल्बचा शोध लावणारा महान शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसनने शोध लावण्यापूर्वी केलेले हजारो प्रयोग अयशस्वी ठरले होते. किरकोळ वाटतो म्हणून हायस्कूलच्या बॉस्केटबॉल टीममधून मायकेल जॉर्डन याला काढून टाकण्यात आले होते. मात्र, हाच जॉर्डन सर्वकालीन महान बॉस्केटबॉलपटू म्हणून जगात नावारूपास आला. केएफसीने जगभर मान्यता मिळविण्यापूर्वी कर्नल सँडर्सला 10 हजार रेस्टॉरंटनी हाकलून लावले होते आणि वॉल्ट डिस्नेला एका दैनिकाने अक्कल नाही, म्हणून नोकरीवरून काढून टाकले होते. जगातील महान यशवंत म्हणून आजही ज्यांच्या नावाचा डांगोरा पिटला जातो, त्यांच्या आयुष्यातील प्रारंभीची संघर्षांची वाट काटेरी होती, हे सर्वविदित आहे.
बर्याचदा असे होते की, एखादी व्यक्ती स्वत:चे एखादे ध्येय ठरवते. ते गाठते आणि त्यानंतर स्मृतिआड जाते. ही अवस्था म्हणजे एखादी परीक्षा देऊन प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्या उमेदवारास कुठलीच गोष्ट सहज साध्य न होणे. एखाद्या लेखकाने एकच पुस्तक लिहून विस्मृतीत जाणे, एखाद्याच चित्रपटात उत्तम अभिनय करून नंतर कुणाच्याच लक्षात न राहणे. तात्पर्य, आपण यशासाठी उपयुक्त ठरणार्या तत्त्वांचा वापर फक्त एकाच क्षेत्रासाठी करतो. एखाद्या क्षेत्रात आपणास यश देणारा मार्ग इतर क्षेत्रात त्याच परिणामकारकतेने वापरला तर तर तुमचे जीवन समृद्ध होऊ शकते.
शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक, उद्योग, व्यवसाय, व्यापार, शिक्षण, कला ही मानवी आयुष्यातील महत्त्वाची क्षेत्रे आहेत. म्हणूनच या सर्व क्षेत्रातील उद्दिष्टांचे संतुलन करून ते साध्य करताना एखाद्या क्षेत्रात ते लवकर साध्य करण्यासाठी आपण जो मार्ग अनुसरतो, तो मार्ग दुसर्या क्षेत्रासाठी अवलंबला जाऊ शकतो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या उमेदवारांनी तर हा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. ‘विन टू द लास्ट’ अर्थात जिंकण्याची जिद्द शेवटच्या क्षणापर्यंत ठेवली पाहिजे. बर्याचदा एका क्षेत्रात मिळालेल्या यशाने हुरळून जाऊन दुसर्या क्षेत्रातील यशासाठी ही तोच राजमार्ग आपण निवडतो आणि यश येण्याऐवजी अपयशच आपल्या वाट्याला येते. याची अनेक ज्वलंत उदाहरणे आहेत. बॉलीवूडचा महानायक, अनभिषिक्त सम—ाट अमिताभ बच्चन यांनी एबीसीएल कंपनी काढून जगभरात सौंदर्य सुंदरी स्पर्धा घेतल्या. पण, केवळ अधिकार्यांच्या भरवशावर त्यांनी कंपनी सोडून दिल्याने त्यांना अपयश आले. कंपनी दिवाळखोरीत गेली. राहता बंगला विकण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली होती. दादासाहेब फाळके पुरस्काराची पहिली मानकरी देविकाराणी हिची अखेर अतिशय दारुण अवस्थेत झाली.
तात्पर्य, एखाद्या क्षेत्रातील यशवंताने दुसर्या क्षेत्रात अपयशी होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ‘यशाची तत्त्वे’ वापरताना त्या व्यक्तीचा चुकलेला मार्ग.